नागपूर :- जागतिक बेघर दिनाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे शहरातील बेघर निवारा केंद्रांमध्ये बेघर नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध वितरीत करण्यात आले.
मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त विशाल वाघ आणि समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये शहरातील बेघरांचा शोध घेउन त्यांना शहरातील विविध भागातील बेघर निवारा केंद्रांमध्ये आणण्यात आले. नागपूर शहरात वास्तव्यास असलेल्या बेघरांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत शहरात सहा ठिकाणी बेघर निवारे सुरू करण्यात आले आहेत. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जागतिक बेघर दिनानिमित्त या निवारागृहांची सजावट करण्यात आली. तसेच परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण देखील करण्यात आले.
बेघरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी, क्षयरोग, मधुमेह, रक्तदाब, मोतिबिंदू व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करून नि:शुल्क औषधोपचार करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बेघर संवाद अंतर्गत बेघरांचे समुपदेशन करण्यात आले. व्यसनमुक्ती व स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले व शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.
जागतिक बेघर दिनानिमित्त कार्यक्रमाला उपजीविका अभियान व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांचेसह डॉक्टर्स, बेघर निवाराचे व्यवस्थापक, काळजीवाहक तसेच बेघर नागरिक उपस्थित होते.