आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून 400 कोटी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

– ‘वेव्ह्ज 2025’ शिखर परिषदेचे यजमानपद महाराष्ट्राला

नवी दिल्ली :- देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन 400 कोटी रूपयांची आर्थ‍िक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio-Visual & Entertainment summit-2025-‘वेव्ह्ज 2025’ ) च्या पहिल्या सत्राचे आयोजन आज सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. या सत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.

जागतिक स्तरावर होणा-या या पहिल्या परिषदेचे यजमान पद महाराष्ट्र राज्याला मिळाले असून, राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. राज्याच्या आर्थिक राजधानीत 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे ही भव्य परिषद संपन्न होणार आहे. आज झालेल्या शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केले असून, या सत्रात विविध देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला.

या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर आपले विचार मांडले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र शासन दरम्यान ‘वेव्ह्ज 2025’ निमित्त सामंजस्य करार झाला.

या सत्राचे प्रास्ताविक केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी केले तर आभार केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी केले. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे,उद्योग विभागाचे प्रधान सचिव एल.अनबलागन उपस्थित होते.

मुंबईत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ची उभारणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्चाची घोषणा

महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक केंद्रामध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) ची स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधताना दिली . या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून याबाबत, केंद्र शासन 400 कोटी रुपयांची आर्थिक सहायता देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली . हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरेल,” मुंबईत उभारले जाणारे IICT केवळ एक शिक्षण संस्था नसून, हे संपूर्ण क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवीन दिशा देणारे केंद्र बनेल. “ही संस्था नावीण्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून भारताला जागतिक पातळीवर नेईल,” ही घोषणा केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या सर्जनशील तंत्रज्ञानाला नवी दिशा मिळेल, असल्याचे त्यांनी सांगितले.k

IICT – जागतिक दर्जाचे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था

प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, ही संस्था केवळ चित्रपट निर्मिती पूरती मर्यादित न राहता, तर डिजिटल कंटेंट, (व्ही.एफ. एक्स) VFX, अॅनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब 3.0 तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल.” मुंबईतील IIT बॉम्बेप्रमाणेच ही संस्था क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी देशातील सर्वोत्तम केंद्र बनेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथील फिल्मसिटी येथे जागा निश्चित केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुंबई-जागतिक स्तरावर क्रिएटिव्ह हब बनणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले , “मुंबई आधीच बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. मात्र, या नव्या संस्थेमुळे भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे. जसे दावोस आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे, तसेच हे व्यासपीठ क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड उभारणारे ठरेल.”

वेव्हज 2025 परिषदेविषयी

वेव्हज 2025 ही परिषद ब्रॉडकास्टिंग, चित्रपट, ॲनिमेशन, गेमिंग, डिजिटल मीडिया, संगीत, जाहिरात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी मोठे व्यासपीठ ठरेल. या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच नवकल्पनांना चालना देण्यासाठी ‘वेव्ह्ज बाजार’, ‘वेव्हएक्सेलेरेटर’ आणि ‘क्रेटोस्फीअर’ या विशेष उपक्रमांची सुरुवात केली जाणार आहे.

यामुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, नवनवीन कल्पनांना चालना मिळेल आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवण्याची संधी मिळेल.

महाराष्ट्र हा भारतीय सर्जनशील अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, चित्रपट, टेलिव्हिजन, डिजिटल कंटेंट, ॲनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. मुंबईत दादासाहेब फाळके चित्रनगरी, फिल्मिस्तान स्टुडिओ, मेहबूब स्टुडिओ आणि फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांसारखी प्रतिष्ठित संस्थाने आहेत. ‘वेव्ह्ज 2025’ परिषदेसाठी 100 देश सहभागी होतील व या माध्यमातून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिंधीना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे, तसेच या परिषदेच्या आयोजनामुळे नवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण, धोरणे आणि गुंतवणुकीबाबत चर्चा होईल.

मुंबई-जागतिक मनोरंजनाचे केंद्र

मुंबई ही भारताची आर्थिक आणि मनोरंजन राजधानी असून, याच पार्श्वभूमीवर ‘वेव्ह्ज 2025’ परिषदेचे आयोजन 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणार आहे. या निमित्ताने मीडिया, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रांना चालना मिळेल आणि जागतिक नेतृत्वाना उद्योगाच्या भविष्यासाठी नवी दिशा ठरवण्याची संधी मिळेल.

सध्या जागतिक पातळीवरील माध्यम आणि मनोरंजन उद्योग झपाट्याने प्रगती करत असून, या क्षेत्राची बाजारपेठ वर्ष 2024 पर्यंत 2.96 ट्रिलियन डॉलर्स होती, भारत या क्षेत्रात 2029 पर्यंत 50 बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच, भारत सध्या 60 हून अधिक OTT प्लॅटफॉर्मसह जागतिक स्तरावर वेगाने विस्तार करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे 20 मार्चला आयोजन

Fri Mar 14 , 2025
– 18 मार्च पर्यंत नमुने सादर करता येतील नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय हातमाग कापड स्पर्धा 2024-25 चे आयोजन 20 मार्च 2025 रोजी सांयकाळी 5 वाजता प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. 2 सिव्हील लाईन, नागपूर या कार्यालयात करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विणकरांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन, प्रादेशिक उपायुक्त, सीमा पांडे यांनी प्रसिद्धी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!