नागपूर. खेळांना व्यासपीठ मिळाले की त्याचा विकास होत जातो. लहान मुले अनुकरणशील असतात आजुबाजूला खेळ सुरू झाले की मुले ते पाहतात आणि ते सुद्धा खेळाकडे वळतात. क्रीडा महोत्सव, क्रीडा स्पर्धांमुळे नवनवीन खेळांची माहिती होते, नवे खेळाडू पुढे येतात. जे आधीपासून खेळत असतात त्यांना नवी संधी मिळते एकूणच खेळ आणि खेळाडूंच्या विकासासह क्रीडा वातावरण निर्माण करण्यासाठी खासदार क्रीडा महोत्सवासारख्या आयोजन महत्वाचे आहे, असे मत व्यक्त करीत ऑलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल सैनी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे कौतुक केले.
खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत ॲथेलेटिक्स स्पर्धेचे मंगळवारी (१७ मे) विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे होणा-या उद्घाटन समारंभासाठी ते नागपुरात आले आहेत. त्यापूर्वी ते बोलत होते. यावेळी ॲथलेटिक्स स्पर्धा समितीचे अध्यक्ष डॉ. शरद सूर्यवंशी उपस्थित होते.
खेळांमध्ये तंत्रज्ञान आल्याने काही गोष्टी अचूक झालेल्या असून यामध्ये होणारा गैरप्रकारावरही आळा बसल्याचे ते म्हणाले. आज खेळाला जास्तीत जास्त प्रोत्साहनाची गरज आहे. मुलांनी मैदानात येण्यासाठी आधी पालकांनी मैदानावर येणे आवश्यक आहे. खेळाची गोडी लावण्यासाठी घरापासून सुरूवात करण्याचे आवाहन गोपाल सैनी यांनी केले.
संपूर्ण क्रीडा कारकिर्दीत तब्बल १७ विक्रम नावावर असलेल्या गोपाल सैनी यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक स्पर्धा विना जोड्याने (अनवाणी) धावल्या. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, रोज ५० ते ५० धावण्याचा सराव करायचो. त्यावेळी १५ रुपये ९५ पैशांना जोडे घ्यायचो पण ते १५ दिवसही टिकायचे नाही. काही वरीष्ठ खेळाडूंनी वापरलेले जोडेही वापरायचो. मात्र ते सुद्धा फार काळ साथ देत नसत. अशात अनवाणी धावण्याचाच सराव केला आणि अनवाणी धावूनच स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, पदकही जिंकले. मात्र आता नियमांत सुधारणा झाल्याने आता जोड्यांशिवाय धावता येत नाही, असे ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरात खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून होणारा खासदार क्रीडा महोत्सव ही स्थानिक खेळाडूंसाठी मोठी संधी आहे. आज अशा पुढाकारामुळे खेळांमध्ये सुधारणा झाल्या, साहित्य मिळू लागले, संधी निर्माण झाल्याचे ते म्हणाले. खेळाडूंनी आपली अशा संधींचा योग्य फायदा करून आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर पुढील लक्ष मिळविण्यासाठी मार्गक्रमण करावे, असेही ते म्हणाले.
क्रीडा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या गोपाल सैनी यांनी क्रीडा भारतीची भूमिका मांडली. खेळ आणि खेळाडूंच्या हिताच्या दृष्टीने क्रीडा भारती आवाज उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थानमध्ये क्रीडा भारतीने घेतलेल्या भूमिकेमुळे खेळाडूंना २ टक्के राखीव कोटा मिळाला. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर त्यांना विविध क्षेत्रात अधिकारी पदावर नोकरी मिळाल्याचे ते म्हणाले. याशिवाय क्रीडा भारतीद्वारे खेळाडूंसह खेळाडूंच्या आईंना ‘जीजाबाई पुरस्कार’ देण्यात येतो, मुलांची क्रीडा विषयक प्रश्नांवर ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येते, खेळाडूंच्या नावाने स्पर्धा घेउन खेळाडूंचा इतिहास आणि माहिती मुलांपुढे मांडली जाते, छोट्या छोट्या केंद्रांवर स्पर्धा घेउन खेळासाठी मुलांना प्रोत्साहित करण्याचे काम क्रीडा भारतीद्वारे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.