२६ ऑक्टोबर हा दिवस ‘‘धम्मक्रांती विजय दिन’’ म्हणून साजरा करावा – सर्व वक्त्यांचे एकमुखी आवाहन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिलेली ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षा २६ ऑक्टोबर १९६४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांविधानिकदृष्टया वैध ठरविली. त्यामुळे समस्त बौद्धजनांनी २६ ऑक्टोबर हा दिवस ‘‘धम्मक्रांती विजय दिन’’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले.

कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानद्वारे डॉ. आंबेडकर मिशन सभागृहात ‘‘बौद्ध धम्म समारोहाच्या वैधतेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर १९६४ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाची प्रासंगिकता’’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते विनायक जामगडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व आंबेडकरी चितंक डॉ. पुरणचंद्र मेश्राम व युवानेते अतुल खोब्रागडे हे होते.

नागपूर विधानसभेच्या १९६२ साली झालेल्या निवडणुकीच्या वैधतेसंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दीक्षाभूमीवर संपन्न झालेल्या धम्मदीक्षा समारोहाला ‘राजकीय सभा’ संबोधून या धम्मदीक्षेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय २६ ऑक्टोबर १९६४ रोजी रद्दबातल ठरवून धम्मदीक्षा सोहळा सांविधानिकदृष्टया वैध ठरविला होता. ह्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ सदर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. पुरणचंद्र मेश्राम म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६  साली दिलेली धम्मदीक्षा सर्वोच्च न्यायालयात वैध ठरविण्यासाठी आपल्या घामाच्या दामातून लोकनिधी उभा करून न्यायालयीन लढा देणारे तत्कालीन आंबेडकरी कार्यकर्ते हे बौद्ध चळवळीचे खरे ध्वजवाहक व धम्मरक्षक असून नव्या पिढीला आंबेडकरी आंदोलनात कृतिप्रणव करण्यासाठी अशा खऱ्या नायकांच्या संघर्षाचा इतिहास उजागर करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

डॉ. मेश्राम पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या ऐतिहासिक निर्णयामुळे १९५६ च्या धम्मदीक्षा समारोहाला केवळ कायदेशीरदृष्ट्या वैधानिकता प्राप्त झाली नाही तर भविष्यात प्रत्येक बौद्धजनांना धम्म स्वीकारण्याचा व इतरांना धम्मदीक्षा देण्याच्या वैधानिक हक्कावर शिक्कामोर्तब झाले होते. हा न्यायालयीन निर्णय म्हणजे धम्मक्रांतीला नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रतिक्रांतीविरुद्ध मिळविलेला विजय होता. या विजयदिनापासून प्रेरणा घेऊन नवा बौद्धमय भारत घडविण्यासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी नव्या पिढीने युद्धसज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी बोलताना युवा ग्रॅज्युएट फोरमचे नेते अतुल खोब्रागडे म्हणाले की, जुन्या पिढीने बुद्ध धम्म वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नव्या पिढीने आपले सांविधानिक हक्क व संविधान वाचविण्यासाठी कटिबद्ध होणे ही काळाची गरज आहे.

अध्यक्षीय भाषणात विनायक जामगडे म्हणाले की, आंबेडकरी जनतेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलेली लढाई केवळ आमदारपदांच्या वैधतेसाठी नव्हती तर धम्मक्रांतीचा इतिहास पुसून टाकण्याचे कारस्थान रचणाऱ्या संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमीची होती. सर्वोच्च न्यायालयाने धम्मदीक्षा वैध ठरविणारा २६ ऑक्टोबर १९६४ रोजी दिलेल्या निर्णयाने बौद्धांच्या धर्मस्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीक्षित आवळे यांनी केले तर आभार  हरीश जानोरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता चिवंडे यांनी केले. कार्यक्रमाला भरगच्च उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरुषोत्तम गायकवाड, दादा अंबादे, हरीश जानोरकर, अतुल वंजारी, कृष्णकांत उके आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आनंद नगरात वर्षावास समाप्ती सोहळा

Tue Nov 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-आनंद नगर येथील बोधिसत्व बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. प्रारंभी भंतेजी च्या हस्ते दिप प्रज्वलन करून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. भंतेजी नी सामूहिक बुद्ध वंदना करुन कार्यक्रमास सुरुवात केली. कार्यक्रमात परित्राण पाठ,चिवर दान,भोजन दान करण्यात आले वर्षावास कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com