– ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान
नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये रविवारी ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान राबविण्यात येणार आहे. शहरातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभापती सभागृहात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे संदर्भात सोमवार (ता.२७) रोजी टास्क फोर्स समितीची बैठक मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीच्या बैठक पार पडली.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात दहा झोनल वैद्यकीय अधिकारी व दहा स्वास्थ निरीक्षक मार्फत रविवारी ३ मार्च रोजी नागपूर शहरात घरोघरी भेट देऊन दहाही झोनमध्ये तसेच शहरात विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या पोलिओ बूथ येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ५ वर्षा खालील बालकांना पोलिओ डोज घ्यावयाचा आहे.
यावेळी बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, आयपीएचे अध्यक्ष डॉ. पाकमोडे, आरसीएच अधिकारी डॉ. बकुल पांडे, पोलिओ वैद्यकीय अधिकारी मेघा जैतवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतीक खान, डॉ. प्रिती झरारिया, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. मीनाक्षी माने, डॉ. दीपांकर भिवगडे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, नागपूर महामेट्रोचे कार्पोरेट कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे सीनियर डीजीएम अखिलेश हळवे, दीपाली नागरे यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, समाज विकास विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
५ वर्षाखालील वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस पाजावयाचा आहे. एकही बालक पोलिओ डोसपासून बंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. या करीता मनपाच्या आरोग्य विभागाकडून ट्रांझीट टिम तसेच मोबाईल टिम तयार करण्यात आलेली आहे. मंदिर, मस्जिद, मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळ व मोबाईल टिमद्वारे, अतिजोखिमग्रस्त भाग, बांधकाम, विभक्त, भटक्या जमातीचे मुले, रस्त्यावरील मुले, अनाथ आश्रमातील मुलांना पोलिओ डोस पाजण्याची सोय केली आहे. तसेच स्लम भाग, स्मॉल फॅक्टरी परिसरातील व इतर ठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची सोय उपलब्ध राहणार आहे.
बेघर, रस्त्यावरील बालकांकरीता २ चमू तयार करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दिनांक ०३ मार्च २०२४ ला सकाळी ०७.०० वाजता सर्व दहाही झोनमध्ये रोटरीक्लबच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.