नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेबाबत शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. बुधवारी (ता. २३) कॉटन मार्केट चौक, नेताजी फुल मार्केट येथे स्वच्छता जनजागृती रॅली काढून बॅन प्लास्टिक पिशवीचा वापर न करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महाले, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, धरमपेठ झोनचे उपद्रव शोध पथक प्रमुख धर्मराज कटरे, धंतोली झोनचे उपद्रव शोध पथक प्रमुख नरहरी भिरकड तसेच उपद्रव शोध पथकाचे ३५ जवान उपस्थित होते.
रॅली दरम्यान नेताजी फुल मार्केट व कॉटन मार्केट येथील दुकानदारांना बॅन प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये. तसेच प्रत्येक दुकानात डस्टबिन ठेवावे, असे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महाले यांनी दिले. सोबतच, मार्केटचा परिसर स्वच्छ ठेवण्यास मनपाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले. यावेळी नेताजी फुल मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष विजय वंजारी यांनी मार्केट मधील स्वच्छतेसंबंधी समस्या सांगितल्या. या सर्व समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महाले यांनी सांगितले.