– अहेरी विधानसभा मतदारसंघात नोंदणीकृत वयोवृद्ध आणि दीव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान
गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 85 वर्षावरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानाने जिल्ह्यात आजपासून लोकशाहीच्या उत्सावाला सुरूवात झाली आहे. अहेरी मतदार संघात गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या सर्व 38 मतदारांनी आज मतदान केले.
अहेरी विधानसभा मतदारसंघातील सिरोंचा येथील किष्तय्या कोम्ममेरा, वर्धना मोदूत, चंद्रय्या बोंताला, अहेरीलतील जैयबुनिशा शेख, मुनिर मो. शेख, जोसेफ मिझ, यशोदा रापरर्तीवार, एटापल्लीतून अंजाना मोहुर्ले आणि नागोराव बेनगुरे, अहेरीच्या गुणप्रिया पाटील, अमर कामिलवार, मुलचेरा तालुक्यातील 98 वर्षीय जगदीश फनीभूषण मित्र, 88 वर्षाच्या महिला मतदार बसंती विश्वास, 35 वर्षे वयाचा दिव्यांग मतदार सुमंत सुशील मंडल यांचेसह एकूण 38 मतदारांनी गृहमतदानासोठी नोंदणी केली होती. या सर्व मतदारांनी आज मतदान केले.
अहेरी विधानसभा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरूवात झाली. आरमोरी विधानसभा मतदारसंघात उद्या दिनांक 9 सप्टेंबर पासून आणि गडचिरोली मतदार संघात 10 सप्टेंबर पासून गृहमतदानाला सुरवात होत आहे.
आरमोरी मतदार संघात 85 वर्षावरील 138 मतदार तर दीव्यांग 72 मतदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 85 वर्षावरील 117 तर दीव्यांग 40 मतदार आणि अहेरी विधानसभा मतदार संघात 85 वर्षावरील 22 तर दीव्यांग मतदार 16 असे जिल्ह्यात 85 वर्षावरील एकूण 277 मतदारांनी आणि 128 दीव्यांग मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली आहे.
लोकशाही प्रक्रीयेत सहभाग नोंदविणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील मतदारांचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे व मतदान अधिकारी चमूने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.