नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूरकरांना २०२३ मध्ये पहिली भेट दिली जाणार आहे. ती म्हणजे अजनी चौकातील क्लॉक टॉवर. नागपूरच्या सौंदर्यीकरणासाठी महत्वाचे असलेले अजनी चौकातील क्लॉक टॉवर पुन्हा एकदा सुरू झाले आहे, या क्लॉक टॉवर च्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, नव्या वर्षात, एका नव्या लूक मध्ये हे क्लॉक टॉवर नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे.
नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे अजनी चौकातील क्लॉक टॉवर मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत भारत सरकारच्या अखत्यारितील एचएमटी लि. कंपनीद्वारे सुरू करण्यात यश आले आहे. सद्यस्थिती या क्लॉक टॉवरच्या सौंदर्यीकरणाचे कार्य प्रगतीपथावर आहे. क्लॉक टॉवर येथे पाण्याचे नवीन कारंजे लावण्यात आले आहे. याशिवाय क्लॉक टॉवर परिसरात एक सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास विविध रंगाच्या रोषणाईने हे क्लॉक टॉवर चौकतुन ये-जा करण्याच्या वाहनचालकांचे, वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहे.
अजनी चौकातील मध्यवर्ती कारागृहाकडून प्राप्त जागेवर २०१२ या वर्षी मनपाद्वारे क्लॉक टॉवर उभारण्यात आले. यासाठी अंदाजे ४० लक्ष रुपये खर्च करण्यात आले होते. २१ मीटर पॅराबोलिक स्टेनलेस स्टील स्ट्रक्चर वर २ मीटर उंचीची प्रिझम शेप सॅटेलाईट वॉच लावण्यात आली होती. या घडी व परिसराचे सभोवतालच्या सौंदर्यीकरणाची देखभाल व दुरूस्तीकरिता दरबार वॉच यांचेद्वारे वार्षिक खर्च ३६ लक्ष रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्या मोबदल्यात संबंधित कंपनीला मनपा क्षेत्रात पाच गॅन्ट्री उभारून १० वर्षाकरिता जाहिरात करण्याचे अधिकार देण्याची मागणी होती. तत्कालीन स्थायी समितीद्वारे पाच गॅन्ट्री उभारून तीन वर्षाकरिता जाहिरात करण्याचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दरबार वॉच कंपनीद्वारे १० वर्षाकरिता जाहिरात देण्याचीच मागणी करण्यात आली. यावर एप्रिल २०२२ मध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पुढाकार घेत या घडीसंदर्भात इतर एजन्सी शोधण्याचे निर्देश दिले होते.
मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार भारत सरकारच्या अखत्यारीतील एचएमटी लि. कंपनीशी संपर्क साधण्यात आला. कंपनीचे अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून निरीक्षण केले. क्लॉक टॉवर दुरूस्तीसाठी कंपनीद्वारे १ लक्ष ७२ हजार ६५२ रुपये खर्च प्रस्तावित असल्याचे कळविण्यात आले. यास मनपा आयुक्तांनी मंजुरी प्रदान केली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या टी.टी.एल व कारखाना विभागाव्दारे पुरविण्यात आलेल्या टेलिस्कोपिक क्रेनचा वापर करून १३ ते २१ जुलै या कालावधीत सतत 9 दिवसरात्र कार्य करून (२०१४) मागील ८ वर्षापासून बंद असलेली घडी सुरू करण्यात यश आले.
लवकरच ‘आम्ही नागपूरी’चा सेल्फी पॉईंट
नागपूर शहराची शान वाढविणाऱ्या या क्लॉक टॉवर परिसरात सौंदर्यीकरणाचे केले जात आहे. देशात कुठेच या स्वरूपात क्लॉक टॉवर नसून अथक प्रयत्नांनी सुरू झालेली घडी पुन्हा बंद होऊ नये यादृष्टीने प्रणाली विकसीत केल्या जात असून, क्लॉक टॉवर परिसरात ‘आम्ही नागपूरी’ असा सेल्फी पॉईंट तयार केल्या जात आहे.