– डिसेंबरमधील नौसेना दिवस कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक
मुंबई :- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियल ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी आदी उपस्थित होते.
आतापर्यंत नौसेना दिवस नवी दिल्ली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस आणि त्यानिमित्ताने आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार भारतीय नौदलाच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.
‘या वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्याचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व खूप मोठे आहे. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे एक संधी आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील रस्ते चांगले करावे. जेट्टीसह विविध सुविधा वेळेत उभारण्यात याव्यात. पर्यावरण विभागाशी निगडित परवानग्या तसेच आवश्यक गोष्टींसाठी विभागांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
प्रधानमंत्री तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या कार्यक्रमात नौदलाच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवण समुद्र किनारी यानिमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नौदलाने दिली. किल्ल्यावर उभारण्यात येणारा शिवछत्रपतींचा पुतळा, कार्यक्रमासाठी आवश्यक जागा, रोषणाई -आतषबाजी यांच्या अनुषंगाने आवश्यक परवानग्या यांचा आढावा घेण्यात आला. भारतीय पुरातत्व खात्याच्या परवानग्या आणि अन्य नियोजनकरिता नवी दिल्लीत मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत येत्या 25 ऑगस्टला विशेष बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत चिपी विमानतळ येथे नाईट लॅण्डिग सुविधा सुरू करणे, हेलिपॅड सुविधा याबाबत चर्चा झाली.