नागपूर – : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत तपासणीत दिव्यांग (कानाने ऐकू न येणे) आढळलेल्या 16 मुलांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. राज्यस्तरीय सामंजस्य करारानुसार धंतोली येथील नेल्सन मदर अँड चाईल्ड केयर हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर शनिवारी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जावून शस्त्रक्रिया झालेल्या मुलांची व पालकांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आरबीएसके) संपूर्ण जिल्ह्यात राबविला जातो. या अंतर्गत 38 आरोग्य तपासणी पथकांमार्फत अंगणवाडी व शाळेतील 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात येते.
कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली सर्व मुले आता ऐकू शकणार असल्याने त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मनोहर शान, डॉ. प्रशांत नाईक, डॉ. श्रीमती नाईक, ऑडिओलॉजिस्ट निलू सोमाणी यांच्याशीही श्री. कुंभेजकर यांनी संवाद साधला.
जन्मापासून ऐकू न शकणाऱ्या मुलांचे लवकर निदान होऊन उपचार करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. ज्या मुलांना जन्मापासून ऐकू येत नाही, अशा मुलांच्या पालकांनी आपल्या जवळच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या चमूशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभेजकर यांनी यावेळी केले.