शादाब पठाणचा स्पर्धा विक्रम

– अ. भा. आंतरविद्यापीठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप

नागपूर :-चेन्नई येथील तामिळनाडू शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विद्यापीठाच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रातुम नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शादाब पठाण ने नव्या स्पर्धा विक्रमाची नोंद केली आहे.

स्पर्धेत सिहोरा येथील कला महाविद्यालयाचा विद्यार्थी शादाबने पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभाग नोंदवित अव्वल स्थानासह सुवर्ण पदक आपल्या नावे केले. शादाब पठाण ने स्पर्धेत १३ मिनिटे ५८.४८ सेकंद इतकी वेळ नोंदविली. आत्तापर्यंत झालेल्या या स्पर्धेत शादाबने सर्वात कमी वेळात हे अंतर पार करून नवीन विक्रमाची नोंद केली. यापूर्वी स्पर्धेत हेच अंतर कुरुक्षेत्रच्या प्रिंसने १४ मिनिटे ५.४८ सेकंदाची वेळ नोंदवित गाठले आहे. तर शादाबने ही वेळ मोडत काढत नवीन स्पर्धा रेकॉर्ड तयार केला.

स्पर्धेत रौप्यपदक हरिओम तिवारी याने १४ मिनिटे ६.४७ सेकंद वेळेसह प्राप्त केले. तर कांस्यपदक शिवाजी विद्यापीठाच्या उत्तम पाटील याने १४ मिनिटे ६.८४ सेकंदासह प्राप्त केले. शादाबने मंगळवारी झालेल्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत २९ मिनिटे २८.६५ सेकंद एवढी वेळ नोंदवित चवथे स्थान प्राप्त केले होते. तर महिला गटात प्राजक्ता गोडबोले हिने देखील चवथे स्थान मिळविले होते. शादाबने आपल्या कामगिरीत सुधारणा करीत वैयक्तिकरीत्या आत्तापर्यंतची सर्वोत्तम वेळ नोंदविली होती.

शादाब हा ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रवींद्र टोंग यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतो.शादाबने केलेल्या या कामगिरीबद्दल नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय स्पर्धेत अर्ध मॅरेथॉन मध्ये नागपूर विद्यापीठाची स्वाती पंचबुद्धे, प्राजक्ता गोडबोले, लिलाधर बावणे, ३ हजार मीटर स्टीपलचेस मध्ये रोहित झा, सौरव तिवारी, तर महिलांमध्ये रिया दोहतरे सहभागी होणार असून या खेळाडूंकडून विद्यापीठाला पदकाची अपेक्षा असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

शादाबने केलेल्या कामगिरी बद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करीत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com