नमामि गंगा… वैनगंगा भेटेल नळगंगेला

नागपूर :-पूर्व पश्चिम विदर्भाची भविष्य रेखा अर्थात विदर्भाचे नंदनवन करणारी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प यासाठी  उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत उत्तर देताना हा प्रकल्प होणारच अशी ग्वाही दिली.

योगायोग म्हणजे हा प्रश्न विधानसभेत चिखलीच्या आमदार श्वेताताई महल्ले यांनी विचारला तर या प्रकल्पाची प्रथम मागणी चिखलीचे सुपुत्र जल अभ्यास डॉ. प्रवीण महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक 3/11/2014 रोजी पत्र देत वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता. आज ८ वर्षाच्या सतत मागणी व रेट्या मुळे विदर्भाचे नंदनवन करणारा वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला जणू काही हिरवी झेंडी मिळाल्याने माझ्यासारख्या जल अभ्यासकाला जो आनंद झाला तो व्यक्त करतो. विदर्भाचे सुपुत्र  देवेंद्र यांचे विदर्भवासियां कडून लाख लाख आभार .

या नदीजोडमुळे विदर्भातील 426 किलोमीटर लांबीचा हा जलमार्ग पूर्व आणि पश्चिम विदर्भाला पाण्याने जोडणारा नवा दुवा ठरणार असल्याने सर्वांच्या मनात ७-८ वर्ष आशेची किरणे निर्माण झाली होती. आज देवेंद्र फडणवीस च्या उत्तराने पूर्णत्वास जाईल असा विश्वास निर्माण झाला.

या प्रकल्पामुळे विदर्भातील ५ लाख ७७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी ८२ हजार कोटी खर्च येणार आहे असला तरी या प्रकल्पातून होणारा विकास पाहता निधीची चिंता करण्याचे कारण नाही.  हा निधी केंद्राने दिला नाही तर महाराष्ट्र सरकार हा निधी उभारून विदर्भातील दुष्काळी भागाचा प्रश्न सोडवणार आहे असेही देवेद्रजीनी सांगितल्याने या प्रकल्पाचे भवितव्य निश्चितच विदर्भाच्या भवितव्याशी जोडले जाणार असल्याचा आनंद आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा आज पल्लवीत झाल्यात. दुष्काळी आवर्षणग्रस्त भागाला याचा निश्चितच फायदा होणार आहे. विदर्भाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत असताना हा नदी जोड प्रकल्प होणार असल्याने या भागातील शेती, उद्योग, पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. पाणी, सिंचन सुविधा उपलब्ध झाल्या तर आर्थिक आणि सामाजिक विकासाचे मार्गही खुले होत असतात, त्याचा सुद्धा फायदा पूर्व विदर्भाला मिळेल यात आता दुमत राहिले नाही.

गोदावरी पाणी तंटा लवादानुसार गोसीखुर्द प्रकल्पात उपलब्ध होणारे संपूर्ण पाणी वापरण्यास महाराष्ट्राला, पर्यायी विदर्भाला मुभा आहे. त्यामुळे वाहून जाणारे हे पाणी वैनगंगा ते नळगंगा या नदीजोड योजनेत वळून यातील प्रत्येक पाण्याचा थेंब ना थेंब समृद्धीकडे नेता येणार आहे.

या प्रकल्पाची तांत्रिक छाननी होताच प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. या प्रकल्पाला मान्यता मिळताच नियोजनाधीन असलेले टप्पा एक, टप्पा दोन, टप्पा तीन असे प्रत्यक्ष काम चालू होऊन यातील टप्पा एकच्या निविदा सुद्धा येत्या एप्रिल – मे पर्यंत निघतील. सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा समावेश झाल्यावर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाची सुरुवात झाली असे म्हणता येईल. हा प्रकल्प नुसताच प्रकल्प नसून, प्रत्येकाच्या आयुष्याला आर्थिक व सामाजिक जोड देणारा प्रकल्प होईल, ही आशा आहे.

डॉ. प्रवीण महाजन, जल अभ्यासक,

डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी, महाराष्ट्र शासन.

सदस्य –  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत ‘चला जाणू या नदीला’ समिती सदस्य, महाराष्ट्र शासन.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com