हिंगणा :- एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत निलडोह या गावात एका २२ वर्षीय युवकाची त्याच गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना काल रात्री ९ च्या सुमारास जुना निलडोह च्या मागच्या रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. चेतन अंकुश मोहर्ले (वय २२)असे मृतकाचे नाव असून काही गुन्हे त्याच्या नावाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या परीसरात तो अवैध दारू विक्री करायचा.तर आरोपी सुद्धा अवैध दारू विक्री करायचा घटनास्थळाच्या बाजूलाच अवैध दारू विक्रीचा गुत्ता आहे. आज सायंकाळी मृतक व आरोपी यांच्यात दारूच्या देवाणघेवाण वरून वाद झाला. यात आरोपींने स्वतःजवळ असलेल्या चाकूने व लोखंडी दांड्याने सुद्धा मृतकावर वार केले त्यानंतर तेथून फरार झाला. परिसरातील काही लोकांना चेतन जखमी अवस्थेत पडून दिसला .एमआयडीसी पोलिसांना याची सूचना देण्यात आली. जखमीला तात्काळ नजीकच्या लता मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी माहितीच्या आधारे त्याच वस्तीतून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे