– प्रजासत्ताक दिनी जनतेला संबोधन
नागपूर :- उच्च दर्जाच्या भौतिक सुविधांची निर्मिती, राहनीमानाचा सुधारणारा दर्जा, विकासाचे विविध प्रकल्प आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणा-या विविध पथदर्शी योजनांची अंमलबजावणी यातून नागपूर शहर येत्या काळात देशाच्या विकासात ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल, असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनी व्यक्त केला.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी २६ जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ध्वजवंदन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त सर्वश्री मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, महेश धामेचा, विजय हुमने, घनश्याम पंधरे, मनपा आयुक्त यांच्या सुविद्य पत्नी चौधरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मनपा अग्निशमन विभागाच्या जवानांच्या तीन तुकड्यांनी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व डॉ. सुनील लहाने यांना मानवंदना दिली. कॉटन मार्केट अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी भगवान मेंढे, लकडगंजचे प्रभारी केंद्र अधिकारी दिलीप चव्हाण आणि सक्करदराचे प्रभारी केंद्र अधिकारी प्रकाश कावडकर यांनी अनुक्रमे तीन तुकड्यांचे नेतृत्व केले.
आपल्या संबोधनात मनपा आयुक्तांनी शहरातील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आज देश विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ अशा सर्वच क्षेत्रात मोठी भरारी घेत आहे. २०४७ पर्यंत देश एक प्रगत राष्ट्र म्हणून आपला ठसा उमटविणार आहे. यात नागपूर शहराचेही मोठे योगदान असेल. आज नागपूर शहरात सर्वत्र विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. देशाच्या हृदयस्थळी असलेल्या शहरातील विविध प्रकल्पांमध्ये नागपूर महानगरपालिकेचा सिंहाचा वाटा आहे. भौतिक, सामाजिक प्रकल्पासोबतच पर्यावरणपूरक शास्वत विकासाचे देखील प्रकल्प शहरात राबविण्यात येत आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतर्गत पोहरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प आहे. नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच अमृत २ अंतर्गत येत्या काळात शहर टँकरमुक्त होईल, असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.
यावेळी आयुक्तांनी आगामी काळात शहरात राबविण्यात येणा-या प्रकल्पांचा उहापोह केला. नागपूर महानगरपालिकेच्या विविध सेवांसाठी नागरिकांची होणारी पायपीट थांबविण्यासाठी मनपाने सर्व सेवा ऑनलाईन करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ही ऑनलाईन प्रणाली नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. याशिवाय वाहतूक प्रश्नांवर तोडगा म्हणून ‘इंटेलिजंट ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टिम’, आपली बस सेवा अधिक बळकट करण्यासाठी ‘इंटिग्रेटेड बस ट्रॉन्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम’ची अंमलबजावणी येत्या काळात करण्यात येणार आहे. आपली बसच्या सेवेमध्ये आणखी ई-बसेसचा समावेश होणार असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांच्या विकासासाठी ‘मिशन नवचेतना’ प्रकल्पाला देखील येणा-या काळात मूर्तरूप दिले जाणार आहे. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना खासगी शाळा, महाविद्यालयांच्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संस्थांन उभारले जाणार असून यासाठी मनपाद्वारे जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्य सुविधेच्या बळकटीकरणाकडे देखील आयुक्तांनी लक्ष वेधले. नागपूर शहरामध्ये मनपाचे रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या श्रृंखलेत आरोग्य वर्धिनी केंद्रांची भर पडली आहे. शहरात ३० आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू असून पुढे आणखी ५० केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर शहराची हरीत शहर अशी असलेली ओळख कायम रहावी व त्यात भर पडावी यासाठी उद्यान विभागाद्वारे शहराचे सौंदर्य खुलविणारे अनेक प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात आहे. शिवाय मनपाचे स्वच्छता कर्मचारी देखील अहोरात्र कार्य करीत आहेत. मनपाच्या या कार्यात नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. नागरिकांनी देखील स्वच्छतेच्या कार्यात मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यानिमित्ताने केले.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व शुभांगी पोहरे यांनी केले. मनीष सोनी यांनी शेवटी आभार मानले.
उपस्थितांनी घेतली कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आयोजित राष्ट्रध्वज ध्वजवंदन समारंभामध्ये कुष्ठरोग निर्मूलन शपथ घेण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ध्वजवंदन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी शपथ घेतली. विभागाच्या स्नेहा पाटील यांनी उपस्थितांना कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ दिली.