मातृभाषाच अभिव्यक्त होण्याचे सर्वोत्तम माध्यम – मराठी भाषा गौरव दिन समारंभात प्रा. सुमंत देशपांडे यांचे प्रतिपादन

नागपूर :- मातृभाषा हेच अभिव्यक्त होण्याचे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन समारंभ’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला. या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून प्रा. देशपांडे बोलत होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. राजू हिवसे, मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मराठीचा आग्रह धरावा असे सांगत प्रा. देशपांडे यांनी इसवी सन पूर्वीपासून मराठी अस्तित्वात असल्याचे दाखले दिले. गाथा सप्तशती पासून वर्तमानातील साहित्याने मराठीला कसे समृद्ध केले याबाबत त्यांनी माहिती दिली. महानुभाव पंथियांनी मराठीचा भाषा म्हणून अंगीकार केला. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी तर संस्कृत मध्ये असलेले ज्ञानाचे भांडार ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपाने मराठीत सर्व सामान्यांना खुले केले. ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने मराठी भाषेची माऊलीच आहे. सतत वाचन केल्यास आपणास उमगत जाते. ५६ भाषांचा गौरव ज्ञानेश्वरीने केला आहे. साहित्याचे परिपाक म्हणजे ज्ञानेश्वरी असल्याचे आपणास दिसून येते. त्यातील नवरसांचे उद्बोधन ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. आद्य कवी मुकुंदराज यांच्या ग्रंथात देखील नवरसांचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तेराव्या शतकात लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमुळे मराठी ही साहित्याची भाषा झाल्याचे प्रा. देशपांडे म्हणाले.

संत एकनाथ महाराज यांनी देखील बोली भाषेत विविध वाड:मय प्रकार वापरून संदेश दिला. गोंधळ, भारुड आदी साहित्य रचनेला वेगळा वाङ्मय प्रकार त्यांनी दिला. त्यांच्या सर्व रचना मराठीतच आहे. शिवाय संत तुकाराम महाराज यांनी देखील मराठीतूनच त्यांच्या साहित्याचे वर्णन केले. तुकाराम महाराज यांचे साहित्य आजही देखील संदर्भासहित वापरले जात आहे. त्यामुळे ते जुनाट, कालबाह्य झाले असे वाटत नाही. अशा श्रेष्ठ परंपरेने वापरलेल्या मराठी भाषेचे आपण पाईक आहोत, असे देशपांडे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यव्यवहार कोष निर्माण करून राजसत्तेचे पाठबळ दिले. अरबी, फारसी, इंग्रज आदी अनेक आक्रमणे मराठीने झेलले आहे. या आक्रमणानंतर देखील मराठी भाषा सर्वसामान्य जनतेने मरू दिली नाही. महाराष्ट्रात काही ठराविक अंतरानंतर बोली भाषेत फरक आढळून येतो. साहित्यिकांमध्ये देखील बोलीभाषा आणि प्रमाण भाषेवरून वाद आहेत. मात्र, मराठी भाषेला व्यवहार प्रतिष्ठा मिळावी याचा आग्रह झाला पाहिजे. मराठीतील पुस्तके वाचून काढा. भाषा नीटपणे अवगत केली पाहिजे. भाषा चांगली बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे. भाषे बाबत आस्था असली पाहिजे असे देशपांडे म्हणाले.

अध्यक्षीय भाषण करताना माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सर्वांनी मराठी भाषेचा गौरव करावा असे आवाहन केले. प्रत्येक राज्यात स्वतंत्र भाषा आहे. मातृभाषेबाबत अभिमान असावा मात्र अहंकार असू नये. मातृभाषा ही महत्त्वाची आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतूनच शिक्षण देण्यावर भर देण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सांगितले. वैद्यकीय अभियांत्रिकी विज्ञान शाखेतील शिक्षण देखील मराठीतूनच मिळणार आहे. विद्यापीठाने तशी तयारी देखील केल्याचे कुलगुरू म्हणाले. यावेळी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राधिकारणी सदस्य, शिक्षक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सरकार तुमचेच, जुनी पेंशन तत्काळ लागू करा - आमदार सुधाकर अडबाले यांचे भाजपला आवाहन

Tue Feb 28 , 2023
महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना, नागपूर विभागतर्फे आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूक प्रचारात “जुनी पेन्शन योजना आमचेच सरकार देऊ शकते”, असे प्रलोभन मतदारांना दिले होते. आता निवडणूक झालीय. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे दोन्ही तुमचेच सरकार आहे, जुनी पेंशन योजना लागू करा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com