नागपूर (Nagpur) : भाजपच्या नेत्यांना मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बोलावयचे आहे. मेट्रोने गड्डीगोदाम येथे चार मजली पूल वेळत उभा केला, मात्र त्याच्या जोडणीचे काम सरतासरत नसल्याने सर्वांच्या उत्साहावर पाणी फेरले जाऊ लागले आहे.
आशियातील पहिल्या चारमजली पूल सेंट्रल एव्हेन्यूवरील गड्डीगोदाम येथे उभारण्यात आला. या पुलासाठी १ हजार ६३४ टन लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. सिताबर्डी ते कामठी मेट्रो मार्गावर झिरो माईल स्टेशनपर्यंत मेट्रो धावत आहे. त्यापुढील कामेही अंतिम टप्प्यात असून, याच मार्गावर गड्डीगोदाम रेल्वे पुलावरून मेट्रो तसेच चारचाकी वाहतूक धावणार आहे. जमिनीवरून जड वाहतूक, त्यावर भारतीय रेल्वे धावणार आहे. त्यानंतर चारचाकी वाहतूक व त्यावर मेट्रो धावणार आहे. जमिनीपासून २४ मीटर उंच, ८० मीटर लांब व १८ मीटर रुंद लोखंडाचा ढाचा यासाठी तयार करण्यात आला होता.
लोखंडी पूल तयार करण्यासाठी १ हजार ६३४ टन लोखंडाचा वापर करण्यात आला असून सर्व भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत. यासाठी ७८ हजार बोल्टचा वापर करण्यात आला आहे. या बोल्टला हाय स्ट्रेन्थ फ्रिक्शन ग्रीप असेही म्हटले जाते. त्यामुळे या लोखंडी पूलाचे आयुष्य शंभर वर्षे असेल, असे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंकित चोखानी यांनी सांगितले.
भाजपला याचे संपूर्ण श्रेय घ्यायचे आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मोदी यांना नागपूरला आणून वातावरण निर्मिती केली जाणार होती. मात्र पूल उभा झाला असला तरी त्याला जोडणारे मार्ग आणि मेट्रोचा ट्रॅक पूर्ण करण्यास विलंब लागत आहे. भाजपच्या सुदैवाने महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. असे असले तरी जानेवारी महिन्यात या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र कामच अपूर्ण असल्याने मोदींना आणायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.