– उत्तर नागपुरातील कामे होत नसल्याने संतप्त; आयुक्तांसह केली विविध भागात पाहणी
नागपूर :- नागपूर महापालिकेच्या माध्यमातून उत्तर नागपुरात होणाऱ्या विविध कामांना मंजुरी मिळाली असतानाही कामे करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केला. मनपा प्रशासनाला गांभीर्य नसून, चालढकल करीत असल्याचा आरोप करीत मंजूर झालेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी गती देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना केले.
डॉ. राऊत यांनी आज महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सोबत उत्तर नागपुरातील विविध भागात जाऊन विकास कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. उत्तर नागपुरातील विविध प्रभागांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. कामे सुरू करण्यासाठी वर्कआर्डरही देण्यात आली असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने डॉ. राऊत यांनी महापालिका प्रशासकावर आपली नाराजी व्यक्त केली.
डॉ. राऊत यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्तांबरोबर कडबी चौक ते टेका नाका रस्त्याची पाहणी व कामठी कडे जाणाऱ्या रोडची पाहणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर ते तथागत चौक पर्यंत काम सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याची पाहणी, कामगार नगर चौक ते टायर चौक पर्यंत रोडची पाहणी, वैशाली नगर येथील राजीव गांधी तरणताल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान तसेच बिनाकी तलावाच्या सौंदर्यीकरण कामाची पाहणी करून आयुक्तांना आवश्यक सूचना केल्या.
येथील कामांकरिता मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केला असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला. उत्तर नागपुरातील मनपाच्या उद्यानांचे सौंदर्य धोक्यात आले आहे. मनपाकडे उद्यानांचा कार्यभार गेल्यानंतर उद्यानांची रयाच गेली तसेच रस्त्यांची कामे, ड्रेनेज दुरुस्ती, स्वच्छता या समस्या सोडवण्यात मनपाला अपयश आले असल्याचे डॉ. राऊत म्हणालेत.
आयुक्तांच्या टार्गेटवर विकास कामे आल्याने आयुक्त काय कारवाई करतात याकडे उत्तर नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. यावेळी सर्वश्री ब्लॉक क्रमांक १३चे अध्यक्ष सुरेश पाटील, ब्लॉक क्रमांक १४चे अध्यक्ष दीपक खोब्रागडे , माजी महापौर किशोर डोरले, हरिभाऊ किरपाने, माजी नगरसेवक सुरेश जग्यासी, दिनेश यादव, महेंद्र बोरकर, पारसराम मानवटकर, रामाजी उईके, गौतम अंबादे उत्तर नागपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश खोब्रागडे, इंद्रपाल वाघमारे, नत्थू रोकडे यांच्या सह उत्तर नागपुरातील विविध प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.