संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मागील सात दिवसांपासून पेट्रोल पंप बंद?
कामठी :- येथील मध्यभागात असलेल्या नागपूर जबलपूर महामार्गावरील मोटर स्टँड चौकात हिंदुस्थान पेट्रोलचा पेट्रोल पंप असून येथील वाहन धारकांना शहरात पेट्रोल भरण्याकरिता एकच पंप असल्याने येथील वाहन धारक याच पेट्रोलपंप वरून पेट्रोल भरत असतात परंतु पेट्रोलपंपच्या संगणकीय तांत्रिक बिघाडामुळे मागील सात दिवसांपासून पेट्रोलपंप बंद असल्याने वाहन धारकांना शहरातून दोन ते चार किलोमीटर अंतरावरील रनाळा समोरील पेट्रोल पंप वर जाऊन वाहनात पेट्रोल भरावे लागत आहे.
मागील काही दिवसांपासून पेट्रोलपंप कधी सुरू तर कधी बंद असा प्रकार असल्याने ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कामठी शहरात मोटर स्टँड चौकात मागील कित्तेक वर्षापासून इंडियन ऑइल कंपनीचे पेट्रोल पंप होते परंतु ते पेट्रोल पंप बंद करून एच पी कंपनीचे पेट्रोल पंप सुरू केले यामुळे वाहन धारकांना पेट्रोल भरण्यास सुविधा झाली परंतु मागील काही दिवसापासून पेट्रोल मिळत नसल्याने पेट्रोलपंपचा लपंडाव खेळ सुरू असल्याने वाहन धारकात असंतोष पसरलेला आहे.
तर नाईलाजस्तव ग्राहकांना दुकानातून चढ्या भावाने पेट्रोल विकत घ्यावे लागत आहे.तेव्हा पेट्रोलपंप मालकांनी सदर ग्राहकांची समस्या गांभीर्याने घेत तांत्रिकीय बिघाडात लवकरात लवकर दुरुस्ती करून पेट्रोल वितरण ची सोय करावी तसेच जुने बंद केलेले इंडियन ऑइल पेट्रोलपंप लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी येथील ग्राहक वर्ग करीत आहे.