पोलिसांचा गैरवापर सुरू आहे ;पोलीस एखादया प्याद्याप्रमाणे काम करत असतील तर महाराष्ट्रातील जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास उडेल – जयंत पाटील

चित्रपटाला केलेला विरोधाचा राग मनात धरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारने ही दुसरी कृती केली…

काल झालेली घटना या व्याख्येत कुठे बसते…

मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर झालेला हा प्रकार होता त्यामुळे त्याचठिकाणी किंवा असं घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा होता…

समाजात माझी मान खाली जाईल अशापध्दतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचा भाग – जितेंद्र आव्हाड

ठाणे  :- मुख्यमंत्र्यांसमवेत त्या महिलेचे फोटो दिसत आहेत. एकंदरीतच त्यानंतर त्या महिलेने रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराचा निषेध करावा तितका कमीच आहे. पोलिसांचा गैरवापर सुरू आहे आणि पोलीसदेखील एखादया प्याद्याप्रमाणे काम करत असतील तर महाराष्ट्रातील जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारच्या पोलिसांनी घेतलेल्या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर आज जयंत पाटील यांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांची भेट घेत पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे ही गंभीर बाब आहे. त्यामुळेच जितेंद्र आव्हाड हे फार व्यतीत झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना देणारा राजीनामा कळवला आहे. त्यामुळे इथे येऊन त्यांची समजूत घालण्यासाठी आलो असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रवासात असताना त्यांच्याबाबतीत असलेली क्लीप पाहिली. याशिवाय काही माहिती लोकांनी दिली. एका कार्यक्रमात त्या महिलेला भगिनी म्हणून जितेंद्र आव्हाड संबोधतात, त्यावरून आव्हाड यांची भावना कळेल आणि या व्हिडीओमध्ये तीच महिला आहे. त्याच भगिनी गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी इथले स्थानिक खासदार हे आधी आव्हाड यांच्यासमोर येतात त्यांना पाठीमागे जाण्यासाठी जागा करून देतात. त्याचवेळी त्या महिलेला ‘गर्दीत कशाला आहात बाजूला थांबा’ असे हात लावून सांगतात. त्या व्हिडीओत त्यापेक्षा वेगळी कृती नाही तरीदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचेच आश्चर्य वाटते असेही जयंत पाटील म्हणाले.

यावेळी जयंत पाटील यांनी विनयभंगाचा गुन्हा कशापद्धतीने असतो याबाबत माहिती दिली.(३५४ कलम लावले आहे. यामध्ये एखाद्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल अशी जबरदस्ती करणे) त्यानंतर त्यांनी राज्यसरकारसह पोलिसांना काल झालेली घटना या व्याख्येत कुठे बसते असा प्रश्न केला.

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गर्दी झाल्यावर माणसांना बाजूला करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाला धक्काबुक्की होत असते मग त्यामध्ये स्री असो पुरुष असो. महाराष्ट्र पोलीस किंवा ठाण्याच्या पोलीसांनी हा प्रकार ३५४ कलमामध्ये बसवला. जर कायद्याची अशीच मोडतोड करून एखाद्याला गुन्हेगार ठरवण्याचे काम जाणीवपूर्वक होत असेल महाराष्ट्रात कायदा आणि सुरक्षा याबाबतीत गृहविभागाने आपला पोलीस विभाग काय काम करत आहे याकडे बघण्याची गरज आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी विधानसभा सदस्यांच्याबाबत झालेल्या घटनेची दखल घेतली आहे की नाही हे दिसत नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर झालेला हा प्रकार होता मुख्यमंत्र्यांनी त्याच ठिकाणी किंवा असं घडल्यानंतर त्याबाबत हस्तक्षेप करायला हवा होता असेही जयंत पाटील म्हणाले.

३५४ च्या घटना बसवून जाणीवपूर्वक एखाद्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असू तर हा कायद्याचा चुकीचा वापर आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’ या सिनेमाच्या विरोधात भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडतोड करून चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात झाला तर महाराष्ट्रातील जनता हे कधी सहन करणार नाही ही ठाम भूमिका मांडली त्याला पक्षाचे समर्थन आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बाजीप्रभूने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात लढाई केली असा चुकीचा इतिहास कधी आपण ऐकला नाही. चित्रपटाला केलेला विरोधाचा राग मनात धरून जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल सरकारने राग मानून ही दुसरी कृती केली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल समाजातील वेगवेगळ्या लोकांनी आपल्या भावना आणि मतं व्यक्त केली आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ज्यांच्याविरोधात लढाई केली आहे त्यांनीदेखील आव्हाड असं करु शकत नाहीत अशी मतं व्यक्त केली आहेत. ती क्लीप बघितली तर जितेंद्र आव्हाड एकंदरीत गर्दीतून बाजूला करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे हे चित्र बघितलं तर यामध्ये कोणत्या प्रकारचा विनयभंग बसतो हे महाराष्ट्राच्या पोलिसांनी आम्हाला सांगावं. याबाबतीत सरकारलाही जाब विचारु आणि पोलीस यापध्दतीने वागत असतील तर पोलिसांनाही या सर्व गोष्टींची उत्तरे द्यावी लागतील असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे. आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याशी बोललो आहे. आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिलेला आहे. त्यांची बराच वेळ समजूत घालावी लागली. त्यांनी राजीनामा देऊ नये अशी माझी भूमिका आहे. पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. पवारा शी चर्चा करुन यावर निर्णय घेऊ अशी विनंती केली आहे. परंतु या सगळ्या प्रकारातून ते व्यतीत झाले आहेत. इतर कोणताही आरोप सहन करेन परंतु ३५४ सारखा गुन्हा सहन करणार नाही असे ते सांगत आहेत. सार्वजनिक जीवनात किती खालच्या स्तरावर राजकारणाचा स्तर गेला आहे किती हीन पातळीवर व्यक्तीगत एखाद्याची निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न होतो यामुळेच आव्हाड व्यतीत झाले आहेत. म्हणूनच त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात विरोध होऊ शकतो. विरोधक हे बोलत असतात. त्या सर्वांना व्यक्तीगत पातळीवर घेणे आणि व्यक्तीगत पातळीवर लढाई करणे आणि पोलीसांच्या सर्व यंत्रणा त्या व्यक्तीच्या विरोधात उभ्या करणे हे चित्र महाराष्ट्रात चुकीचे आहे. आज एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असे चित्र उभे रहात आहे. आणि महाराष्ट्रातील, ठाणेकरांची सहानुभूती जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर आहे असे दिसते. आव्हाड यांची यामध्ये कुठली चूक दिसत नाही. चूक असेल तर आम्हीही सांगू की आव्हाड यांनी गंभीर चूक केली आहे. मात्र यात तसं काही दिसत नाही. स्वतः मुख्यमंत्री बघत असल्याचे दिसत आहे. दोन हातावर असताना अशी कृती कोण करु शकतो का. त्यामुळे सरकार कसे चालले आहे याचा महाराष्ट्राने अभ्यास करणे आवश्यक आहे आणि याच्यावर महाराष्ट्र विचार करेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मला त्या महिलेच्या मागच्या इतिहासाबद्दल आता काही बोलायचं नाही. त्यांना त्या व्हिडीओमध्ये शिवीगाळ केलीय की अपशब्द वापरला आहे त्यामुळे ‘राईवरुन पर्वत गाठणे’ चुकीचे आहे. मला खात्री यावर न्यायव्यवस्था विचार करेल असे सांगतानाच जितेंद्र आव्हाड यांना सतत अडचणीत आणणे आणि ठाण्यात राष्ट्रवादीचा नेता भक्कमपणे अयोग्य असेल त्यावर बोट ठेवण्याचे काम करत असताना सत्ताधारी पक्षाला ते अडचणीचे झाले आहेत हे स्पष्ट झाले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

सत्तेच्या विरोधात कोण आज बोलत नाहीय. एकटे आव्हाड याविरोधात मजबूतीने उभे आहेत. बाजू मांडत आहेत. वाचा फोडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला त्याबद्दल विरोध केला म्हणून दोन दिवसाने अटक होते याचे समर्थन कोण करु शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे.त्यांनी ही क्लीप पाहिली पाहिजे आणि त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला जर पटले तर मग न्यायालयात जी काही लढाई होईल ती लढू. मात्र अपेक्षा आहे की त्यांच्या डोळ्यासमोर घडलेली घटना आहे त्यामुळे नक्की काय झाले आहे हे पोलीसांना समजावून सांगतील असेही जयंत पाटील म्हणाले.

‘हर हर महादेव’ घटना घडली त्यानंतर दोन दिवसाने अटक होते. म्हणजे प्लॅन करुन अटक झाली आता ही घटना घडली मुख्यमंत्र्यांसमोर आणि गुन्हा रात्री बारा वाजता दाखल झाला. यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिसत आहे.

महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत त्याच्याकडे पोलिसांचे लक्ष असले पाहिजे. असे अत्याचार कुठेही झाला त्याला प्राधान्य असते मात्र असे गुन्हे दाखल केले आणि याचा वापर राजकीय टूल म्हणून सत्ताधारी करायला लागला तर मात्र हे गंभीर आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

समाजात माझी मान खाली जाईल अशापध्दतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचा भाग – जितेंद्र आव्हाड

माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंदवला असता तरी चालले असते परंतु ३५४ हा गुन्हा मला मान्य नाही. आणि जो मी आयुष्यात केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय दाखल केला. तक्रारीत शब्द वापरले आहेत ते त्यापेक्षा व्हिडीओ क्लीअर आहे कोणते शब्द वापरले आहेत .

समाजात माझी मान खाली जाईल अशापध्दतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचा भाग झाला. आहे त्यामुळे राजकारण करावं मी मंत्री असताना माझ्या वागण्याची पद्धत सगळ्यांना माहित होती. सरकार सगळ्यांचे असते आमदारांमध्ये भेदभाव केला नाही. मला असेच पोलीस ठाण्यात नोटीस देत आहे म्हणून बोलावले. थोड्यावेळाने डीसीपी आले त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मी मुंबईत जातोय म्हटल्यावर तुम्हाला अटक करण्यात येत आहे असे सांगण्यात आले. ४१ अन्वये नोटीस दिल्यानंतर ७२ तास त्या व्यक्तीला द्यावे लागतात. त्या नोटीसमध्ये पाच वाजता चौकशीला हजर रहा सांगत आहेत. इंग्रजाच्या काळातील कलम लावून उपजीविकेच्या साधनात अडचण केली म्हणून मला अटक करण्यात आली.

आम्ही माफी मागणार नाही.

आम्ही लढलो शिवाजी महाराजांसाठी आणि लढत राहू त्यामुळे जेलमध्ये राहणे हे नवीन नाही. जेम्स लेन आला तिथपासून लढत आहे. आणि ही लढाई अविरत चालू राहील. पण पोलिसी बळाचा वापर कशासाठी त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही. परंतु माझ्यावर ३५४ गुन्हा दाखल करता. माझ्या खुनाबद्दल प्लॅनिंग झाले असते तर काही वाटलं नसते परंतु ३५४ चा गुन्हा दाखल करता इतके खालचे राजकारण त्यापेक्षा यात न राहिलेले चांगले असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती ‘बालक दिन’ म्हणून साजरी

Mon Nov 14 , 2022
अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती ‘बालक दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, एल.एल.एल.चे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, उपकुलसचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com