– वित्तीय संस्थांकडून ३ हजार ५०० कोटी २०२८ पूर्वी प्रकल्प पूर्ण करणार
नागपूर :- बहुप्रतिक्षित मेट्रो टप्पा दोनच्या कामांना येत्या एप्रिलपासून सुरुवात होणार असून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने (एडीबी) एक हजार ५२० कोटी तर युरोपियन इन्वेस्टमेंट बॅंकेने (ईआयबी) दोन हजार ५८ कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य करण्यास मंजुरी दिली आहे. २०२८ पूर्वीच मेट्रो टप्पा दोनचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित यांनी आज स्पष्ट केले.
मेट्रो भवनात आठव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन केल्यानंतर वेग आला आहे. मेट्रो टप्पा दोनचे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले असले तरी त्यापूर्वीच हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दिसेल, असा विश्वास डॉ. दिक्षित यांनी व्यक्त केला. वित्तीय संस्थांसोबत लवकरच करार होणार आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या एप्रिलपासून प्रकल्पासाठी माती परीक्षण व इतर कामे एकाच वेळी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात बुटीबोरीपर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार असून हे अंतर १९ किमीचे आहे. लोकमान्यनगर स्टेशनपासून हिंगण्यापर्यंत सात किमीचे मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे. ऑटोमोटिव्ह चौकातून कन्हानपर्यंत १३ किमी तर प्रजापतीनगर ते कापसीपर्यंत साडेपाच किमीचे मेट्रोचे जाळे टाकण्यात येणार आहे. मेट्रोच्या टप्पा दोनमध्ये ४४ किमीचे जाळे पसरविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ९ हेक्टर जागा लागणार आहे. मेट्रोचे जाळे मुख्यत्वे रस्त्याच्या मध्यभागातून जाणार असल्याने जमिन अधिग्रहणाचे आव्हान राहणार नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम वेळेच्या पूर्वीच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सध्या मेट्रोच्या फेऱ्या १० वाजेपर्यंत होत आहे. रात्री उशीरापर्यंतही फेऱ्या वाढविण्याची तयारी आहे. लोकांकडून मागणी झाल्यास रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रोची सेवा सुरू करण्यात येईल, असेही डॉ. ब्रजेश दिक्षित यांनी नमुद केले. मेट्रो तिकिट विक्रीशिवाय मालमत्ता विकासातून नागपूर मेट्रोला २०० कोटींचा महसूल मिळाला. दरवर्षी तीनशे कोटींचा महसूल मिळण्याची क्षमता आहे. त्यामुळे नागपूर मेट्रो देशातील एकमेव फायद्यातील मेट्रो ठरेल. सध्या मेट्रो वर्षाकाठी २० ते २५ कोटी तोट्यात आहे, असेही त्यांनी सांगितले.