नागपुर :- सी.पी.अॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूल मध्ये २७ जून रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ साजरा करण्यात आला. प्रहार मिलिटरी स्कूल मधील प्रहारी पार्थ पुरोहित 93.20% आणि प्रहारी दिव्यांश पाटील याने 91% गुण प्राप्त केले. शाळेतील प्रथम प्रहारी पार्थ पुरोहित, प्रहारी दिव्यांश पाटील यांना प्रत्येकी रुपये 5000 धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना 70% च्या वर गुण प्राप्त झालेल्या 12 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रुपये 1000 धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता पूजन करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष मेजर जनरल ए.एस.देव, अनिल महाजन शाळेचे सचिव, शाळेच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मेजर जनरल ए.एस.देव यांनी आपल्याकडे जी साधने उपलब्ध आहेत त्यातूनच यश कसे प्राप्त करावे, हे एका कथेच्या माध्यमातून सांगून विद्यार्थ्यांना आपली ओळख बनवा, आपला आत्मविश्वास वाढवा, असे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष निमंत्रण होते. त्यांनी मुलांचा कौतुक सोहळा सुखद नेत्रांनी अनुभवला. शाळेतील सर्व शिक्षक गण, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीतगायनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका विशालाक्षी यांनी केले.