साखर कारखान्यांची फसवणूक टाळण्यासाठी लवकरच बैठक  – सहकार मंत्री अतुल सावे

नागपूर, दि. 28 : ऊस गाळप हंगामात ऊस तोड मजूर पुरविणे आणि वाहतुकीचे करार गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाच्या माध्यमातून होण्यासाठी साखर कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत 9 जानेवारी 2023 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री अतुल सावे बोलत होते. त्यांनी सांगितले, की राज्यात सद्य:स्थितीत चालू गाळप हंगामात 96 सहकारी व 92 खासगी, असे एकूण 188 साखर कारखाने कार्यरत आहेत. राज्यातील साखर कारखान्यांची वाहतूकदार, मुकादम, ऊस तोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून साखर आयुक्तालयाने तयार केलेल्या महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार ॲपमध्ये गेल्या दोन वर्षातील माहिती संकलित केली आहे. एकच वेळी राज्यात 200 साखर कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी गाळप करत असल्यामुळे प्रत्येक हंगामापूर्वी साखर कारखाने वाहतूकदारांबरोबर ऊस तोडणीसाठी करार करीत असल्यामुळे अन्य कारखान्यांमध्येसुद्धा तेच वाहतूकदार, मुकादम, ऊस तोडणी कामगार मोठ्या प्रमाणात उचलून घेऊन व रक्कम बुडवून कारखान्याची फसवणूक होत असल्याचे, साखर कारखान्यांच्या संकलित माहितीतून निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात 2004 ते 2020 पर्यंत सुमारे 40 कोटी रुपयांची फसवणूक मुकादमाकडून झाल्याची माहिती ॲपद्वारे प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर याबाबतच्या व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, बबनराव शिंदे, विनय कोरे, प्रकाश अबिटकर यांनी सहभाग घेतला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com