– ‘सिखें’च्या उपक्रमात शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
यवतमाळ :- जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ आणि ‘सिखें’ संस्था यांच्या संयुक्त समन्वयातून ‘टीचर इनोव्हेटर कार्यक्रमांतर्गत’ कळंब येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कला, गुणांना वाव देणारे भाषा व गणित विषयाचे प्रदर्शन नुकतेच पार पडले.
सिखेंचे राज्य प्रमुख शरदचंद्र पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इक्बाल हसन सदस्य अब्दूल रज्जाक कुरेशी, मुख्याध्यापक रेहान खान, शिक्षक सार्जिल खान, सिखेंचे जिल्हा समन्वयक संभाजी भिसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत भाषा आणि गणित विषयाच्या पद्धतींवर इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रतिकृती, गणितीय संकल्पना मांडल्या. विविध प्रकारचे मोड्युल तयार करून त्यावर उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. भाषेच्या पद्धतीवर माहिती देत गणितातील विविध क्रिया करून दाखविल्या. मॉड्युल कसे तयार केले, मॉड्युलचा उपयोग कसा केला जातो, हेही चिमुरड्या विद्यार्थ्यांनी यावेळी स्पष्ट केले. पाहुण्यांनी व पालकांनी मॉड्युलवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तर देत आपण काय शिकलो, याचे प्रात्यक्षिक यावेळी घडविले. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होताना व शिकलेल्या गोष्टी आपल्या शब्दात मांडताना बघून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
२०२३-२४ या शैक्षणिक सत्रात कळंब तालुक्यात पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिखें संस्थेच्या माध्यमातून टीचर इनोव्हेटर कार्यक्रम राबविल्या जात आहे. या कार्यक्रमात भाषा आणि गणित विषयाच्या शिकवण्याच्या विविध नाविन्यपूर्ण पद्धतीचे प्रशिक्षण शिक्षकांना दोन टप्प्यात देण्यात आले. विद्यार्थी या कार्यक्रमामुळे अधिक क्रियाशील व शिकते झाले. त्यासोबतच शिक्षक व पालकांनीही विद्यार्थ्यांवर परिश्रम घेतल्याचे या प्रदर्शनातून दिसून आले, असे प्रतिपादन सिखेंचे राज्य प्रमुख शरदचंद्र पाटील यांनी यावेळी केले.
सिखेंच्या या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी सर्व पद्धतींवर विद्यार्थ्यांसोबत वर्गात काम केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्तरात वाढ होण्यास मदत झाली. सोबतच विद्यार्थ्यांना दिलेल्या कार्यपुस्तिकेमुळे त्यांना प्रत्यक्ष सराव करण्याची रूची निर्माण झाल्याचे, शाळेचे मुख्याध्यापक रेहान खान यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा कळंब येथील शाळेचे शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक सहभागी झाले होते.