माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा – संचालक हेमराज बागूल

नागपूर : “माध्यमांचा परिघ वेगाने विस्तारतो आहे. त्यांचे प्रवाह बदलत आहेत. या परिस्थितीत विश्वासार्ह, अधिकृत, प्रमाणित माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. अशा माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा”, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(प्रशासन) हेमराज बागूल यांनी विद्यार्थ्यांना केले.

संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयमार्फत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ आणि प्रिमिअर ॲकॅडमी, नागपूर येथील विद्यार्थ्यांची विधान भवन, नागपूर येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी माहिती व जनसंपर्क शिबिर कार्यालयात आयोजित ‘शासन आणि जनसंपर्क’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, प्रा. सुरेश जाधव, प्रा. विभा जाधव, प्रा.श्रृती इंगोले उपस्थित होते.

संचालक बागूल म्हणाले, “माध्यम क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. मुद्रित, दृकश्राव्य, समाजमाध्यमांचा प्रभाव वाढतो आहे. या बदलत्या काळात अधिकृत, प्रमाणित माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. या माहितीवर प्रक्रिया केल्याशिवाय माहितीचे ज्ञानात रूपांतर होत नाही. बाजारप्रधान जगात, प्रतिमानिर्मितीच्या युगात तुम्हाला स्वत:चे भवितव्य घडवायचे आहे. साहित्य, अुनभूती, चिंतनाच्या माध्यमातून मानसिक जडणघडण होत असते. विद्यार्थ्यांचा मानसिक विकास महत्वाचा असून त्यांचे सृजन आणि सर्जन विकसित झाले पाहिजे. त्यासाठी वाचनाबरोबर स्वत:शी बोला”.

“विस्तारलेल्या साधनांचा उपयोग योग्य पद्धतीने करा. मुद्रित, दृकश्राव्य माध्यमे, समाज माध्यम, जनसंपर्क क्षेत्र, संशोधन, संवाद या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. संयम ठेवून स्वत:ची कौशल्ये विकसित करा. त्यामुळे तुम्हाला या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच समाज माध्यमांचा अतिरेकी वापर टाळावा”, असेही बागूल यांनी सांगितले.

‘विधिमंडळ समिती पद्धती’ या विषयावरील व्याख्यानात विधानमंडळ सचिवालयातील उपसचिव विलास आठवले म्हणाले की, विधिमंडळ समिती म्हणजे विधानमंडळाची प्रतिकृती असते. समित्यांचे विविध प्रकार आहेत. सार्वजनिक हितासाठी समित्यांचे कामकाज सुरू असते. लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती अशा विविध समित्यांच्या माध्यमातून प्रशासनावर अंकुश ठेवला जातो. विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहाचे कामकाज सुरू असते. प्रशासनावरील नियंत्रणासाठी समिती कार्यपद्धती महत्त्वाची समजली जाते.

‘विधिमंडळ कामकाज आणि प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने म्हणाले की, लोकशाही मजबूत करण्यात प्रसारमाध्यमांचे मोठे योगदान आहे. माध्यमे अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, समाजसुधारक आगरकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या लेखणीला नैतिक अधिष्ठान होते. राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्याप्रमाणे पत्रकारिता अभिव्यक्तीचे कार्य करते आहे. माध्यमे आणि शासन परस्परांशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. त्यामुळे लोकशाही टिकून राहण्यास मदत होते.

लोकानुरंजन न करता लोकप्रबोधनात्मक बातम्या देण्यासाठी पुढाकार घ्यावा. सनसनाटीशरण न होता लोकप्रबोधनात्मक पत्रकारिता करा, असे आवाहनही मदाने यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी अरफान पठाण, कीर्ती जाधव, कल्याणी वरकुडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतीच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती कळण्यासाठी लवकरच ई पंचनामे - शंभूराज देसाई

Wed Dec 28 , 2022
नागपूर : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, सततचा पाऊस आदी कारणांमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती कळावी यासाठी यापुढे डिजिटल माध्यमाचा उपयोग करून ई पंचनामे करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. गेल्या पाच महिन्यात शेतकऱ्यांना निकषापेक्षा अधिक मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा सदस्य दीपक चव्हाण यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!