“माय मरो, पण मावशी जगो” असं आपल्याकडे म्हणतात. परंतु, आजच्या काळात मावशा इतक्या, म्हणजे आईपेक्षाही प्रेमळ सापडणं कठीणच आहे. त्यात मावशी राजकीय असेल तर महाकठीण. पूतना मावशी निघण्याचीच शक्यता अधिक ! वैचारिक दिवाळं निघालेला महान काँग्रेस पक्ष सध्या याचाच अनुभव घेत आहे. ममता नाव असलेली, जुनी आपलीच, पण आता दुरावलेली मावशी इतकी कठोर निघेल, असं त्यांना वाटलंच नाही. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना, काँग्रेसचे राजपुत्र भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले असताना, काँग्रेसचं नाव घेऊन या मावशीनं घमंडिया आघाडीच्या थोबाडातच मारली आणि काँग्रेसचा घमंड तोडला ! अन् आघाडीची बिघाडी करून टाकली. आताही घमंडिया आघाडीतील सर्व मोदीविरोधक ममतादीदीला बंगालची वाघीण म्हणतील का !
पण, खरं सांगतो, ममता ही वाघीणच आहे. ज्या पद्धतीनं दीदीनं 2011 पासून बंगालवर एकहाती ताबा मिळवला आहे, तशी कामगिरी आधीच्या काँग्रेस राजवटीतील एकाही नेत्याला करता आली नाही. कारण, बंगालमधील सर्व ‘दिग्गज’ काँग्रेसनेते नेहमी दिल्लीश्वरांच्या कृपेवरच जगत आले. अगदी सिद्धार्थ शंकर राय, प्रणव मुखर्जी, आताचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधुरी… सारे फक्त बाहुले ! असं तालावर नाचणं मान्य नव्हतं म्हणून तर ममता काँग्रेसबाहेर पडली आणि बांगला अस्मितेचं कार्ड (मां, माटी, मानूष) खेळत एका झटक्यात कम्युनिस्ट आणि काँग्रेस या दोघांनाही भुईसपाट केलं. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना भोपळाही फोडता आला नाही, एवढी दुर्गती !
तरीही ममता घमंडिया आघाडीत सहभागी का झाली ? एकमेव कारण- मोदीविरोध. यानिमित्तानं राष्ट्रीय नेतृत्व हाती आलं तर कोणाला नको असतं ? परंतु, राष्ट्रीय स्तरावर तर आनंदीआनंदच आहे. काँग्रेसला आपल्या राजपुत्राची पडली आहे. ते टार्गेट ठेवूनच दोन भारत जोडो यात्रा काढण्यात आल्या. ही दुसरी न्याय यात्रा बंगालमध्ये फिरणार आहे. साहजिकच ममतादीदी सावध झाल्या आणि “एकला चलो रे” चा नारा देऊन आघाडीला त्यांनी रामराम केला! काँग्रेसची स्थिती आता “पंजा मारला वाघिणीनं, बघतोस काय रागानं” अशी झाली आहे.
देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या बंगालसारख्या मोठ्या राज्याचा सत्ताधारी पक्ष आघाडीत नसेल तर कसं होईल हो ? मायावती नाही. ओडिशाचे पटनायक नाही. बिहारच्या नितीशकुमारांचा भरोसा नाही. राहिला द्रमुक. तो कट्टर हिंदुविरोधी. कम्युनिस्ट तर हिंदूंचा रागच करतात. महाराष्ट्राची उबाठा शिवसेना आता भ्रामक हिंदुत्ववादी. एकूण, घमंडिया आघाडीचे कडबोळे हिंदुत्वविरोधकच (त्यात ममतानं मोठा वाटा बाहेर काढला) आणि रामललामुळे देशभरातील वातावरण चार्ज झालेलं. बिहारचे ‘गरीब’ मुख्यमंत्री राहिलेले कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा रामबाणही नेमका याचवेळी सोडण्यात आला. कसं होईल आघाडीचं ? ममता मावशीनं भाच्यांना असं वाऱ्यावर सोडणं बरं आहे का ? एटा तुमी भालो करो नी, माशीमा !
– विनोद देशमुख