– महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन
यवतमाळ :- महाराष्ट्र विविध प्रथा, परंपरांनी नटलेले समृद्ध राज्य आहे. येथील साहित्य, संस्कृती, कला, संगीत, समृध्द गडकिल्ले महाराष्ट्राचे वैभव आहे. अशा राज्यात आपण वास्तव्य करतो, ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहन झाले. त्यावेळी शुभेच्छा देतांना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीस पालकमंत्र्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी अनेक मराठी बांधवांना सातत्याने संघर्ष करावा लागला. या संघर्षात 105 बांधवांना शहीद व्हावे लागले. या सर्व शहीदांना पालकमंत्र्यांनी नमन केले.
महाराष्ट्र पुण्यभूमी आहे. महाराष्ट्राने अनेक थोर, विद्वान देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शुरविरांमध्ये महाराष्ट्राच्या शुरविरांचा अग्रक्रमाने सहभाग होता. देशभर सामाजिक, आर्थिक सुधारणेची चळवळ उभी करणारे अर्थतज्ञ, घटनाकार, भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर सोबतच या देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची महाराष्ट्र ही कर्मभूमी होती, असे पालकमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र राज्याचा गौरवशाली ईतिहास, प्रथा, परंपरांचे संवर्धन करत राज्याला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्नरत राहिले पाहिजे. राज्याच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत महाराष्ट्र घटविण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्व थोर, महनिय व्यक्तींना देखील मी याप्रसंगी नमन करतो, असे पालकमंत्री राठोड म्हणाले. ध्वजारोहनानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरिक्षण केले. पोलिस व होमगार्डच्या पुरुष व महिला दलाच्यावतीने यावेळी मानवंदना देण्यात आली.
विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण
पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वणी तालुक्यातील गणेशपुर साझाचे तलाठी सुमेध भिमराव अघम यांना आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आला. जामवाडी घाटात डिझल टॅंकरला अपघात होऊन लागलेली आग विझविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामासाठी नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी विनोद खरात यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
आपल्या 29 वर्षाच्या पोलिस सेवेत चोखपणे कर्तव्य बजावल्याबद्दल पोलिस हवालदार संतोष पांडे तसेच 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ, नवी दिल्ली येथील कार्यक्रमात तुतारी वाजविण्याची संधी मिळाल्याबद्दल महिला पोलिस कर्मचारी सुषमा मारोती मेश्राम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.