नागपूरमध्ये १६ ते २६ फेब्रुवारी “महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन २०२४” चे आयोजन – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई :- मुंबई येथील ‘महालक्ष्मी सरस’ २०२३ – २४ ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनाने या वर्षी अतिरिक्त सरस नागपूर येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे. १६ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘महालक्ष्मी सरस’ चे नागपूर येथे रेशिमबाग मैदानावर आयोजन केले असून याला नागपुरकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी आशा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

मंत्री महाजन म्हणाले की, ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यास राज्यस्तरावर, विभागस्तरावर आणि जिल्हास्तरावर प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येते. सन २००४ पासून ग्राम विकास विभागांतर्गत मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. देश पातळीवर प्रत्येक राज्यात विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागच्या वेळी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत २६ डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत BKC मुंबई, मध्ये १९ वे महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रदर्शनाला मुंबई आणि परिसरातून विक्रमी प्रतिसाद मिळाला. नागपूरच्या महालक्ष्मी सरसमध्ये एकूण २५० स्टॉल असतील यामध्ये १०० खाद्यपदार्थांचे व १५० इतर स्टॉल्स असतील.

राज्यातील ग्रामीण भागातील महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याकरीता सन २०११ पासून ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ३४ जिल्ह्यातील ३५१ तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समुहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून त्यांना यशस्वी उद्योजिका म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. अभियानांतर्गत महिलांच्या उपजीविकेवर भर देण्यात येत असून आतापर्यंत ६ लाख ३९ हजार २९१ स्वयंसहायता समूह, ३० हजार ७६७ ग्रामसंघ, १ हजार ८५० प्रभागसंघ, ३०७ महिला शेतकरी उत्पादक कंपनी व १० हजार ७१४ उत्पादक गट स्थापित झालेले आहेत. ६३ लाखापेक्षा जास्त महिला अभियानाशी प्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला या पूर्वीपासूनच पारंपरिक व अपांरपरिक अशा शेती आधारित व बिगर शेती आधारित व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या आहेत. अभियानातील बहुतांशी महिलांनी यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे व विविध उत्पादनांची निर्मिती करीत असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचा मुख्य उद्देश देशातील व राज्यातील स्वयंसहाय्यता समुहांतील महिलांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच समुहांतील सदस्यांना विविध राज्यातील उत्पादने, विक्री व बाजारपेठेची माहिती देणे व राज्या- राज्यातील लोकांचे राहणीमान, खाद्यसंस्कृती व कलाकुसर इ.चा परस्परांना परिचय करुन देणे. शहरी भागातील लोकांना अस्सल ग्रामीण भागातील वस्तू/पदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यभरातील विविध भागांतील वैविध्यपूर्ण चवींचे खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होत असल्याने नागपूरकरांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने मेजवानीच मिळणार आहे. राज्यस्तरावरील महालक्ष्मी प्रदर्शनात नेहमी सहभागी होत असलेले सर्व प्रकारचे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत यामुळे अभियानाला प्रचार व प्रसिद्धी तसेच महिलांच्या उत्पादनांना राज्यातील इतर मोठ्या शहरात मागणी व प्रसिद्धी मिळेल.

नागपूर येथील सरसच्या आयोजनामुळे विदर्भातील स्वयंसहाय्यता गटांना बाजापेठ उपलब्ध होण्यासाठी व त्यांच्या उत्पादकतेला तसेच व्यावसायिकतेला चालना मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. मुंबईच्या सरसमध्ये हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी असल्याच्या भावना मुंबईकरांनी व्यक्त केल्या होत्या. त्याच हेतूने नागपूर शहरात हे प्रदर्शन आयोजित केल्यामुळे नागपूरकरांनाही हा अनुभव मिळणार आहे. महालक्ष्मी सरस हा आता विश्वासार्ह ब्रान्ड झाला आहे. या प्रदर्शनातून गुणवत्ता, दर्जा आणि शुद्धता त्याचबरोबर वाजवी दर यासाठी उमेद अभियानाकडून बारकाईने कार्यवाही केली जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NMC Cancels Scheduled Shutdown for GH - Medical Feeder

Sat Feb 10 , 2024
Nagpur :- The Nagpur Municipal Corporation (NMC) announces the cancellation of the previously scheduled 48-hour shutdown for the GH-Medical feeder, which was set to take place from 12th February 2024 to 14th February 2024. The decision to cancel the shutdown was made due to a critical requirement of water at the Government Medical College (GMC). The NMC recognizes the importance […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com