संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22:- शेती व्यवसायामध्येही नियोजन महत्वाचे आहे. त्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही. ही बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आल्याने खरिपाच्या नियोजनासाठी कृषी विभाग कामाला लागला असून केवळ कागदोपत्री नियोजन न करता थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून हे नियोजन ठरवले आहे त्यानुसार चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामठी तालुका कृषी विभागाच्या वतीने 25 जून ते 1 जुलै दरम्यान कामठी तालुक्यातील सर्व गावामध्ये खरीप हंगाम पूर्व कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. तेव्हा या मोहिमेत गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत . यानिमित्ताने 25 जून ते 1 जुलै दरम्यान कामठी तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या खरीप हंगाम पूर्व कृषी संजीवनी मोहीमेच्या अनुषंगाने प्रत्येक दिवशी मुद्देनिहाय कार्यक्रम, प्रात्यक्षिके,चर्चासत्र चा समावेश राहणार आहे.यानुसार 25 जून ला विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार मूल्यसाखळी बळकटीकरण, 26 जून ला पौष्टिक तृणधान्य दिवस, 27 जून ला महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, 28 जून ला खत बचत दिन, 29 जून ला प्रगतिशील शेतकरी संवाद दिवस, 30 जूनला शेतकरी पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस तर 1 जुलै ला कृषी दिवस साजरा होणार आहे.तरी सर्व शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांनी केले आहे.