नागपूर :- आपल्या शेतातील मालाला जेव्हा भाव येईल तेव्हा विकता यावे यासाठी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना शासनाने सुरु केली आहे. या हंगामासाठी 1 ऑक्टोबरपासून शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ होत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाने केले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याचा उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समित्यामार्फत “शेतमाल तारण कर्ज योजना” राबविण्यात येते. सन 2022-23 या हंगामातील शेतमाल तारण कर्ज योजनेस दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होत आहे. शेतकऱ्याच्या मालाला तारण देणारी महत्वकांक्षी अशी योजना असून या योजनेतून तुर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान) करडई, ज्वारी, बाजारी, महा, गहू, वाघ्याघेवडा (राजमा) बेदाणा, हळद, काजू बी व सुपारी आदीना लाभ दिला जातो. शेतकरी कमी भावाच्या काळात ही उत्पादने बाजार समितीकडे तारण ठेवू शकतात. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपला माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करुन वाढीव रक्कम शेतकऱ्यांना परत मिळते. अशा सुविधांमुळे शेतमालास चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे.