आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प – छगन भुजबळ

अर्थसंकल्पातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच…

मुंबई :- राज्यावर वाढत असलेला कर्जाचा बोजा साडे सहा लाख कोटींहून अधिक असताना प्रत्यक्ष वास्तवाचा विचार न करता राज्यात नुकत्याच निवडणुकांमध्ये बसलेला फटका बघता राज्यातील जनतेला खुश करण्याच्यादृष्टीने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निव्वळ जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

कांदा,कापूस,सोयाबीन, भाजीपाला आदी सर्व शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्यात एकीकडे शेतकरी शेतमालाची होळी करत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ठोस अशी घोषणा करण्याची गरज असताना कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अर्थसंकल्पातून तरी किमान आपल्याला मदत मिळेल याकडे आशा लावून बघत होता. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक शब्दही नाही. पंचामृतामधील थेंब काही त्यांच्या वाट्याला आला नाही असा टोलाही छगन भुजबळ यांनी सरकारला लगावला.

राज्याचा विकासदर नेहमी देशाच्या विकास दरापेक्षा अव्वल असतो.मात्र राज्याच्या विकास दरामध्ये २.३ टक्क्यांची घसरण निश्चितच चिंताजनक आहे. देशाच्या विकासदरापेक्षा राज्याच्या विकासदराची घसरण झाली आहे.राज्यातील नागरिक महागाईने त्रस्त असून महागाई कमी करण्याच्यादृष्टीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसत नाही. केवळ भरीव तरतूद करू अशी निव्वळ धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.

अनेक नवीन महामंडळांची घोषणा करून विविध समाजातील बांधवांना जवळ करण्याचा प्रयत्न म्हणजे आगामी निवडणुकीतील बेरीज – वजाबाकी आहे. मुळात अगोदरच जी महामंडळे अस्तित्वात आहे त्यांच्यासाठी निधीच्या तरतुदीबाबत कुठलीही स्पष्टता दिसली नाही. केवळ निधी देऊ असे म्हटले आहे यावर जनता कितपत विश्वास ठेवेल हा खरा प्रश्न असल्याची टीकाही छगन भुजबळ यांनी केली.

नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग, नाशिक निओ मेट्रो प्रकल्प यासाठी निधी देण्यात येईल पण किती निधी उपलब्ध करून देण्यात येईल यामध्ये कुठलीही स्पष्टता नाही. इतर शहरांमध्ये मेट्रो आणि नाशिकची समजूत टायर बेस निओ मेट्रो देऊन का काढली. फक्त बस जाणारा फ्लायओव्हर असा त्याचा अर्थ. नाशिकला मेट्रो का नको? दमणगंगा-पिंजाळ नार – पार इत्यादी नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून करू अशी घोषणा केली मात्र कुठल्याची निधीची तरतूद केलेली दिसत नाही. निव्वळ अनेक घोषणा करून जनतेला दिवसा स्वप्न दाखविण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मुळात ज्यांनी सत्तेवर येताच जनतेच्या हिताची कामे स्थगिती करण्याचा निर्णय घेतला. अद्याप त्यातील अनेक कामे स्थगित आहे. त्यांच्या तोंडून अनेक योजनांची घोषणा होतेय यावर जनता किती विश्वास ठेवेल ही शंकाच असल्याची सडकून टीकाही छगन भुजबळ यांनी केली.

मोठमोठ्या रस्त्यांबद्दल भाष्य केले मात्र जिल्हा आणि तालुका स्तरावरील जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग रस्त्यांनी दुर्दशा कधी संपणार? त्याचप्रमाणे बेरोजगारी कमी करायची असेल तर जोपर्यंत मोठमोठे उद्योग येणार नाही तोपर्यंत रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फूले यांच्या नावाने ओबीसींसाठी स्वतंत्र घरकुल योजनेची आमची मागणी होती, अर्थसंकल्पात ओबीसींसाठी घरकुल योजनेची घोषणा केली मात्र त्याला मोदी आवास घरकुल योजना असे नाव देण्यात आले.ओबीसी महामंडळाला एक रुपयाचीही तरतूद नाही.स्वाधार आणि स्वयंच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची घोषणा होईल असे वाटत होते मात्र ओबीसींचा भ्रमनिरास केला आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेच्या जागेचा विकास करून याठिकाणी आद्यमुलींची शाळा सुरु करावी व स्मारक विकसित करावे अशी आमची सातत्याने मागणी होती. याबाबत हे स्मारक विकसित करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याची सुबुद्धी सरकारला आली त्याबद्दल छगन भुजबळ यांनी शासनाचे आभार देखील मानले आहे.

NewsToday24x7

Next Post

Raksha Mantri Rajnath Singh holds telephonic conversation with his Australian counterpart Richard Marles

Sat Mar 11 , 2023
Both sides reaffirm commitment towards further strengthening bilateral defence relationship New Delhi :-Raksha Mantri Rajnath Singh held a telephonic conversation with Deputy Prime Minister & Minister for Defence of Australia Richard Marles on March 09, 2023. Both the Ministers reaffirmed their commitment towards further strengthening the bilateral defence relationship. The telecon was reflective of the trust and friendship the two […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com