– काँग्रेसची हुजरेगिरी करण्याची वेळ उबाठांवर आली
मुंबई :- दिल्ली दौ-यामधील पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणार अशी वल्गना करत आहेत. मात्र हिंदुत्वाला तिलांजली, सरकारी योजनांमध्ये खोडा घालण्याचे प्रयत्न, 2019 मध्ये जनादेशाचा केलेला अनादर यामुळे उबाठा सेनेला जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश समन्वयक विश्वास पाठक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हत्या होत असताना निषेध करण्याएवढेही उबाठा सेनेचे हिंदुत्व जागृत नाही असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राज्याच्या भल्यासाठी, जनतेच्या हितासाठी दिल्लीला जातात तेव्हा, महाराष्ट्र दिल्लीच्या इशा-यावर चालू देणार नाही या शब्दांत उद्धव ठाकरे टीका करतात. मग हेच ठाकरे महाशय आता दिल्ली दौ-यावर का गेले ?…… मुख्यमंत्रीपदाची याचना करण्यासाठी कोणाच्या दारात गेले?….दिल्ली दौ-यामध्ये ठाकरे यांनी आपणच किती कार्यक्षम मुख्यमंत्री होतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत विविध नेत्यांच्या भेटींदरम्यान मुख्यमंत्रीपदाची याचना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. महाविकास आघाडीतील एका सहकाऱ्याने त्यांच्या पुस्तकात तत्कालिन मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या संपूर्ण मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केवळ एक दिवस मंत्रालयात गेले याची खंत वाटते असे मत व्यक्त केले होते. यावरूनच एक मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंची कार्यक्षमता काय होती हे दिसून येते असा टोलाही त्यांनी लगावला
पत्रकार परिषदेमध्ये बांगलादेशबाबत बोलताना ठाकरे यांनी तारे तोडले, बांगलादेशसारखी स्थिती भारतात देखील उद्भवू शकते. अशी चिथावणीखोर भाषा, हिंदुत्वापासून कोसो दूर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी त्वरित थांबवावी असाही इशारा दानवे यांनी दिला. शिवसेना – भाजपा युतीच्या काळात निवडणुकीचे जागावाटप, रणनीती ह्या सगळ्याच्या चर्चा, बैठका प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर होत असत मात्र आता जागावाटपासाठी दिल्लीला राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांच्या दारात जाण्याची पाळी तुमच्यावर आली आहे, असे टीकास्त्र ही त्यांनी सोडले.