नागपूर :- भाग आदिवासी असो,दुर्गम असो, कितीही असुविधा असो, व्यसनाधीनता असू द्या, जगातल्या कोणत्याही समस्येवर समाधान शोधण्याचे कसब शिक्षकांकडे असते. त्यामुळे शिक्षकांचे मुख्यालयी रहाणे, विद्यार्थी आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात आश्रम शाळेत शिकलेल्या मात्र सध्या अमेरिकेत कार्यरत असलेल्या वैज्ञानिक डॉ.भास्कर हलामी यांनी आज येथे केले.
शासनाच्या सोयी, सुविधा व योजनांचा लाभ घेऊन आपले भविष्य घडविणाऱ्या व इतरांना प्रेरणादायी ठरलेल्या विद्यार्थ्यांसोबत ‘टी विथ ट्रायबल सेलिब्रिटी ‘, अशा कल्पक कार्यक्रमाचे आयोजन अप्पर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आदीवासी विभागामार्फत केले आहे. या कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना शास्त्रज्ञ भास्कर हलामी यांनी आपल्या संघर्षमय जीवनात वसतिगृहातील शिक्षकांच्या भूमिकेचे कौतुक केले. मुख्यालयी शिक्षक राहणे, शिक्षकाची कायम उपलब्धता असणे, विद्यार्थ्यांच्या संस्कृतीशी समरस शिक्षकांनी होणे, त्यांच्या पालकांशी व विद्यार्थ्यांच्या समस्यांची जवळून जाणीव होणे, सर्व समस्यांचे समाधान करणे असते. त्यामुळे सुदृढ समाज निर्मितीत शिक्षकांनी आपले दातृत्व समजून घ्यावे, असे आवाहनही हलामी यांनी केले.
डॉ. भास्कर हलामी अमेरिकेतील एका मोठ्या औषध कंपनीत वैज्ञानिक म्हणून काम करतात. मात्र त्यांचे प्राथमिक शिक्षण दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गडचिरोली जिल्हयातील भामरागड सारख्या आदिवासी भागातील आश्रम शाळेत झाले आहे. भामरागड सारख्या आदिवासी भागातील शाळेतून त्यांनी दहावी पास केली. त्यांना एकच गोंडी भाषा येत होती. मराठी, इंग्रजी भाषा न येणाऱ्या या विद्यार्थ्याने आता अमेरिका सर केली आहे. बिकट परिस्थितीत त्यांनी यश संपादन केले आहे. या यशाचे सर्व श्रेय ते आपल्या शिक्षकांना देतात. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळा व तेथील शिक्षक या भागाचा कायापालट करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्हीएनआयटीमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली होती. त्यानंतर ते अमेरिकेत एका मोठ्या औषध कंपनीत सध्या कार्यरत आहेत.
शासकीय योजनांचा लाभ सर्वांना मिळतो. त्याबद्दल अनेकांना माहिती नसते. मात्र माहिती करून घेण्याची जिज्ञासा, समाजामध्ये दर्जेदार शिक्षण निर्माण करत असते. शिक्षक ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे पालक झाले. त्यांच्या संस्कृतीशी समरस झाले. तर योजनांच्या लाभापासून विद्यार्थ्यांच्या भविष्यापर्यंतचे प्रश्न सुटू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
हालाखीच्या परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व शिक्षकांमुळेच कळल्याने दिवाळी सारख्या सुट्ट्यांमध्ये देखील होस्टेल न सोडून जाता अभ्यास करीत राहिलो. म्हणून मोठ्या पदावर पात्र ठरू शकलो. आमच्यासारख्या आदिवासी समाजातील शिकून मोठ्या झालेल्या लोकांनी समाजाला दातृत्वाच्या भावनेतून समाजाला परतावा दयावा, जिद्द, मेहनत, जिज्ञासा ठेवणारी मुले परिस्थिती पुढे गुलाम राहू शकत नाही. मात्र शिक्षकांनी त्यासाठी आपले दायित्व समजून विद्यार्थ्यांना हवे तेव्हा उपलब्ध व्हावे, सगळ्याच अवगुणांपासून सुटका होणे व सरळ मार्गी अभ्यासाला लागणे हे चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात शक्य आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आदिवासी विभागाकडून असा मी घडलो, या उपक्रमात आज सहभागी झालेले भास्कर हलामी यांना ऐकायला विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी निश्चित प्रेरणादायी ठरतील, अशी आशा यावेळी आदिवासी अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर प्रभू राजगडकर, प्राध्यापक श्याम कोरोटी उपस्थित होते.