नवी दिल्ली :- भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान आज सकाळी 0945 च्या सुमाराला कोसळले. भारतीय हवाई दलाच्या सुरतगढ येथील तळावरून या विमानाने रोजच्या नियमित प्रशिक्षणाअंतर्गत फेरी मारण्यासाठी उड्डाण केले होते. त्यानंतर लगेचच आपत्कालीन स्थिती उद्भवली. त्यानंतर वैमानिकाने प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार विमानाला पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरल्यावर त्याने विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या. सुरतगढच्या ईशान्येला 25 किलोमीटर अंतरावर वैमानिकाला जखमी अवस्थेतून बाहेर काढण्यात आले.
अपघातग्रस्त विमानाचा सांगाडा हनुमानगढ जिल्ह्यातील बहलोल नगर येथील एका घरावर कोसळला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यु झाला. भारतीय हवाई दलाने जीवितहानीबद्दल खेद व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास लावण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.