– पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेचे उदघाटन
– पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ संदेश
– ३२ राज्यातील १४०० खेळाडूंचा सहभाग
नवी दिल्ली :- भारतीय पॅरा खेळाडूंनी या वर्षी चीनमध्ये झालेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. पदकांचे शतक भारतीय खेळाडूंनी पार केले. ही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची फक्त झलक होती. आता पुढील स्पर्धेत ही संख्या आणखी वाढेल आणि २०३० मध्ये भारताच्या पदकांमध्ये दुपटीने वाढ होईल, असा विश्वास केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
क्रीडा मंत्रालय आणि साईच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचे सोमवारी क्रीडा मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वर्षी आपण १११ पदके जिंकू शकतो, तर २०३० पर्यंत ही पदकांची संख्या २००च्या पुढे जाऊ शकते असा विश्वास निर्माण करताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी उपस्थित पॅरा खेळाडूंचा उत्साह वाढवला. देशातील क्रीडा संस्कृती वाढविण्याच्या दृष्टिने आणि खेळामधील रुची सर्वच पातळीवर वृद्धिंगत करण्यासाठी या पॅरा खेलो इंडियाची आम्ही सुरुवात केली आहे. ही स्पर्धा म्हणजे नव्या भारताची उपलब्धी असेल, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.
क्रीडा क्षेत्रासाठी अंदाजपत्रकात केलेल्या वाढीमुळे पदकांची संख्या वाढण्यास मदत झाली. यामुळे आम्ही खेळाडूंसाठी अधिक सुविधा उपलब्ध करू शकलो आणि खेळाडूंनी त्याचा फायदा उठविल्यामुळे या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठे येश मिळाले. तुम्हीही असेच पुढे जा, सरकार तुमच्या पाठिशी आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास व्हिडिओद्वारे पाठवला.