– नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च – नालसार विधी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो.श्रीकृष्ण देव राव यांचे प्रतिपादन
– राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, येथे ‘उत्तरायण-II’ 2024 प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
नागपूर :- जागतिकीकरणामुळे सर्वच क्षेत्रात डिजिटल क्रांती घडून आली असून आयकर आणि करसंकलन क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान वेळोवेळी शिकत राहणे क्रमप्राप्त असल्याचे प्रतिपादन हैदराबाद येथील नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च – नालसार विधी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो.श्रीकृष्ण देव राव यांनी केले . नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – एनएडीटी येथे आयोजित सात आठवडे कालावधीच्या ‘उत्तरायण-२’ 2024 या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . याप्रसंगी एनएडीटीचे प्रशिक्षण महासंचालक आनंद बैवार,अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मनीष कुमार तसेच ‘उत्तरायण-II’ या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण संचालक एस.एम.वी.वी. शर्मा आणि अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगण हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आयकर अधिकाऱ्यांनी कायद्याचे ज्ञान आणि कायद्याचे तत्त्व याविषयी आपली कौशल्य अजून संवर्धित करून आपली निर्णय क्षमता अजून वृद्धिंगत करावी असेही प्रो.श्रीकृष्ण देव राव यांनी सांगितले.प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँन्ड्रीग ऍक्ट अर्थात पीएमएलए हा नवीन फौजदारी कायद्यासारखा काम करत आहे तसेच नवीन साक्ष कायद्यातंर्गत तांत्रिक पुरावा हा अमुलाग्र बदल घडवीत आहे. या दोन कायद्यांचा आणि आयकर क्षेत्रातील विविध नियम आणि कायदे यावर अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नवपदोन्नत आयकर सहायक आयुक्तांसाठी ‘उत्तरायण-II -2024’ या प्रशिक्षण वर्गात एकूण 116 अधिकाऱ्यांची असून यामध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या 20 एवढी आहे.या प्रशिक्षण वर्गात 18 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून अधिकारी सहभागी झालेली असून यामध्ये बिहार राज्यातील सर्वाधिक अधिकारी त्या पाठोपाठ महाराष्ट्र आणि विविध राज्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशिक्षण वर्गातील सर्वाधिक तरुण अधिकारी हे 45 वर्षाचे असून सर्वात ज्येष्ठ अधिकारी हे 59 वर्षाचे आहे या तुकडीचे सरासरी सेवा वय हे 52 असल्याचे राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे संयुक्त संचालक एस.एम.व्ही शर्मा यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी नवपदोन्नत आयकर सहाय्यक आयुक्तांनी कर प्रशासकाची शपथही घेतली.