– 8 ऑक्टोबरपर्यंत राहणार खुले
नागपूर :- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे राज्यस्तरीय विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी सभागृहात प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्गाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांच्यासह खादी व ग्रामोद्योग मंडळाचे विदर्भातील विविध जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केले. राज्यभरात महात्मा गांधी यांची जयंती ते पुण्यतिथीदरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याची सुरुवात नागपूरपासून करण्यात आली असल्याचे चेचरे यांनी सांगितले.
मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जगताप यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात मंडळाचे सभापती साठे म्हणाले की, ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंडळ प्रभावी योजना राबवत आहे. रोजगार निर्मिती हे प्रामुख्याने ध्येय आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनांची र्मिती गरजेची आहे. उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी रामडोहकर यांनी केले तर आभार अनिता देशमुख यांनी मानले.
प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन
मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वर येथील शुद्ध मधुबन मध, वर्धा-नागपूर येथील खादीचे दर्जेदार कपडे, विविध प्रकारचे मसाले, लाकडी घाण्यावरील तेल, लाकडी हस्तकलेच्या वस्तू, फायबर मूर्ती, बांबूच्या कलात्मक वस्तू, आवळा खाद्य पदार्थ, गुळ, मेणबत्ती आदी वस्तूंचे 62 स्टॉल या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनात भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागपुरकरांसाठी नि:शुल्क खुले असणार आहे. ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जास्तीत-जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन वस्तू खरेदी कराव्या, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केले आहे.