– मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणात अंजुमन इस्लामचे योगदान उल्लेखनीय : राज्यपाल रमेश बैस
मुंबई :- गेल्या १५० वर्षांपासून शिक्षण, कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अंजुमन ई इस्लाम संस्थेने देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात तसेच मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणामध्ये उल्लेखनीय योगदान उल्लेखनीय दिले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी येथे काढले.
सन १८७४ साली स्थापन झालेल्या मुंबईतील अंजुमन- ई – इस्लाम शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेच्या १५० व्या वर्षपूर्ती महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २७ जुलै) मुंबई सेंट्रल येथील सैफ तय्यबजी मुलींच्या शाळेच्या सभागृहात संपन्न झाले, त्यावेळी बोलत होते. यावेळी संस्थेत अध्यापन करीत असलेल्या आणि गेल्या पाच वर्षात पीएचडी प्राप्त करणाऱ्या ५७ शिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘अंजुमन’चे अध्यक्ष डॉ झहीर काझी, वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रविंद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे विश्वस्त प्राचार्य, शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
जवळपास शंभर शैक्षणिक संस्थांचे संचलन करणाऱ्या अंजुमन संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी देशात अनेक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे असे नमूद करून संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिक्षक प्रशिक्षण अकादमी’ तयार करुन देशासाठी उत्कृष्ट शिक्षक निर्माण करावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
भारत जगातील सर्वात युवा राष्ट्र म्हणून उदयाला आले आहे. आगामी काळात अनेक देशांना भारताकडून युवा मानव संसाधनाची गरज भासेल. अश्यावेळी युवकांना शिक्षण, तंत्रशिक्षण, संभाषण कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांची आहे असे सांगून ‘अंजुमन’ संस्थेने आपल्या क्रीडा अकादमीच्या माध्यमातून योग प्रशिक्षक देखील घडवावे, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबईत उच्च शिक्षण तसेच नोकरीसाठी येणाऱ्या महिलांसाठी संस्थेने वसतिगृहे देखील निर्माण करावी, असेही राज्यपालांनी सांगितले.
अंजुमन संस्थेचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते. संस्थेने महिला सक्षमीकरणात मोठे योगदान दिले असून अंजुमनच्या विविध शैक्षणिक संस्थांचे संचलन करणाऱ्यांपैकी ९० टक्के शिक्षक व कर्मचारी महिला आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांनी सांगितले. अंजुमन संस्थेने अमेरिकेतील जगप्रसिद्ध एमआयटी संस्थेसोबत शैक्षणिक सहकार्य करार केला असून भारताला विश्वगुरु बनविण्याच्या प्रयत्नात ‘अंजुमन’ अग्रेसर असेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अंजुमन समुहातील साबू सिद्दीक अभियांत्रिकी महाविद्यालय, कालसेकर टेक्निकल कॅम्पस, अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅरिस्टर ए आर अंतुले विधी महाविद्यालय व अंजुमन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मधील ५७ शिक्षकांचा पीएचडी प्राप्त केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले यांनी आभार प्रदर्शन केले.