नागपूर :- सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. गुरूवारी २९ फेब्रुवारी २०२४ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघ दक्षिण-पश्चिम नागपूर येथे शासन आपल्या दारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रामदासपेठ येथील मेजर आनंद खरे लेंड्रापार्क येथे २९ फेब्रुवारी ते 2 मार्च २०२४ या कालावधीमध्ये शासन आपल्या दारी शिबिर असेल. सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेमध्ये नागरिकांना शिबिरामध्ये सहभागी होता येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने शासनाद्वारे या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरूवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
नागरिकांना शिबिरात नगर भूमापन सिटीसर्व्हे, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय सेतू केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग, नागपूर महानगरपालिका, अन्न व नागरी पुरवठा विभाग, बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय आदी विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.