नागपूर :- जिल्हा प्रशासन, मनपा आणि जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या २५ सप्टेंबर रोजी आयोजित “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” कार्यक्रम नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी कळविले आहे.
दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीला पूर्वपदावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्हयात अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपातकालीन परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाकडून येत्या २५ सप्टेंबर रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह व परिसर येथे पूर्वनियोजीत “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हा कार्यक्रम स्थगित करण्यात आलेला आहे. तद्वत या कार्यक्रमाशी निगडीत सर्व संबंधित विभाग, यंत्रणा व जिल्हयातील दिव्यांग नागरिक यांनी याची नोंद घ्यावी, या अभियानाची सुधारीत तारीख कळविण्यात येईल असे भोयर यांनी कळविले आहे.