राज्यात 27 फेब्रुवारीरोजी पल्स पोलिओ मोहीम

– एक कोटी पंधरा लाख बालकांना डोस देणार

  मुंबई दि. 22 : राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले.
यंदाच्या वर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
बैठकीस आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, अवर सचिव मं.प. कुडतरकर, महिला बालकल्याण विभाग सहाय्यक आयुक्त नितीन मस्के, आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी सचिन खांडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. धीरेन कलवाडीया, डॉ. हेमंत बंगोलिया आदी उपस्थित होते.
डॉ. रामास्वामी यांनी सांगितले की, बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. या दोन्ही लसीकरणाचे नियोजन करताना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावर परिणाम होऊ देऊ नका. पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमही मिशन मोडवरच राबविणे आवश्यक आहे.
पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमेसाठी महसूल, पोलीस, सहकार, शिक्षण, महिला बालविकास आणि नगरविकास विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी यांना सहभागी करुन घ्यावे. याबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हास्तरावर प्रचार-प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेची केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. सहाय्यक संचालक डॉ. सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरण व्दारे दिली.
बैठकीस शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, पश्चिम रेल्वे, महिला बालकल्याण, ग्राम विकास विभाग, नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत
राज्यातील सर्व जिल्ह्यात २७ फेब्रुवारीला राबविणार
एक कोटी पंधरा लाखाहून अधिक बालकांना डोस देण्याचे नियोजन
राज्यासाठी १.५४ कोटी डोस उपलब्ध
राज्यात ९२९५३ बूथ उभारणार
आरोग्य विभागाची २६१२६९ पथके घरोघरी भेट देणार
ट्रान्झिट पथकांची संख्या २९१२१
मोबाईल पथकांची संख्या १५१८२
आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, एएनएम यांचा सहभाग घेणार
मिशन इंद्रधनुष्य लसीकरण
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लसीकरण केले जाणार
सात मार्च, चार एप्रिल आणि नऊ मे पासून सलग सात दिवस मोहिम राबविण्यात येणार.
नऊ जिल्हे आणि दहा महापालिका कार्य क्षेत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार
गर्भवती आणि दोन वर्षांखालील मुलांना लस देणार

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हे पाहूनही डोळ्यात पाणी आले नाही तर... असे का म्हणाले अनुपम खेर?

Tue Feb 22 , 2022
अभिनेते अनुपम खेर यांच्या बहुचर्चित ‘काश्मिर फाइल्स’ सिनेमाचा ट्रेलर अनेकदा पाहिला गेला आहे. हाच ट्रेलर कूवर पोस्ट करत खेर यांनी काही भावनिक ओळीही पोस्ट केल्या आहेत. खेर यांनी लिहिले आहे, हे आहे ‘काश्मिर फाइल्स’ सिनेमाचे ह्रद्यविदारक ट्रेलर. हे पाहूनही तुम्ही अंतर्बाह्य हलून जाणार नसाल तर…तीन मिनीट तीस सेकंदांचे हे ट्रेलर काश्मिरी पंडितांच्या संघर्षमय जगण्याची झलक दाखवते. ‘काश्मिर फाइल्स’ हा सिनेमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!