कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

▪️ आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न 

नागपूर :-  जिल्ह्यात मान्सूनचे स्वरुप व यात होणारे बदल लक्षात घेता कोणत्याही स्थितीत जीवित वा वित्तीय हानी होऊ नये यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी इतर विभागाशी परस्पर समन्वय ठेवून योग्य ते नियोजन व दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपुर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे व सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

गत सहा वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात 30 व्यक्तींना प्राणास मुकावे लागले. योग्य ती काळजी आणि खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. हवामानाचा अंदाज व शासनाने वेळोवेळी केलेले आवाहन लक्षात घेऊन खबरदारी घेतल्यास नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या या हानीला आपल्याला रोखता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात सुमारे 157 पूरप्रवण गावे असून सर्वाधिक 34 गावे ही सावनेर मध्ये आहेत. त्या खालोखाल कामठी-22, मौदा-20, नरखेड-17, हिंगणा- 13 व इतर गावे उर्वरित तालुक्यातील आहेत. जिल्ह्यातील नदी नाल्यांची संख्या व स्थिती लक्षात घेता ग्रामपातळीपासून तालुका पातळीवरील तहसील, पंचायत समिती, तालुक्का रुग्णालय यांच्यासमवेत जिल्हा पातळीवरील सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

जिल्हा पातळीवर नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी नियंत्रण कक्ष निर्माण केला असून प्रत्येक संबंधित विभागांनी आपल्या जवळ असलेल्या साहित्यांची व्यवस्थित देखभाल करुन त्या आवश्यकता भासल्यास सहज उपलब्ध होतील यादृष्टीने त्याचे व्यवस्थापन करण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रत्येक लहान मोठ्या धरणावर पूरप्रवण पुलांवर निगराणी ठेवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत विभाग प्रमुखांना त्यांनी सांगितले. याच बरोबर आपदा मित्र व समाजातील जागरुक वर्गांचे सहकार्यही नैसर्गिक आपत्तीत लाख मोलाचे ठरते. यादृष्टीने लोकसहभागातून नियोजनावरही भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील वेदर स्टेशन अर्थात हवामान केंद्र, त्या-त्या तालुक्यातील अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, महानगरपालिका यांनी आपआपला आढावा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत सादरीकरण केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आता अर्थसंकल्पाचीही '' फाळणी '' करण्याचा काँग्रेसचा इरादा! - कल्याण येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

Thu May 16 , 2024
कल्याण :- धर्माच्या नावाने देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसला आता धर्माच्या नावावर देशाच्या अर्थसंकल्पाचेही विभाजन करावयाचे असून हिंदू आणि मुस्लिमांकरिता स्वतंत्र अर्थसंकल्प लागू करण्याचा काँग्रेसचा विचार आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कल्याण येथे जाहीर प्रचार सभेत केला. कल्याण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत मोदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!