मुंबई :-प्रथमच हायब्रीड पद्धतीने 17-21 एप्रिल 23 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आणि नुकत्याच पार पडलेल्या लष्कर कमांडर्स परिषदेत, धोरणात्मक , प्रशिक्षण, मनुष्यबळ विकास आणि प्रशासकीय पैलूंवर विस्तृत चर्चा करण्यात आली आणि भविष्यासाठी लष्कराला सज्ज ठेवण्याविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.लष्करी कमांडर्स आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्याच्या / उद्भवणाऱ्या सुरक्षा परिस्थितींचा आढावा घेतला आणि भारतीय लष्कराच्या कार्यान्वयन सज्जतेचा आणि तयारीचा आढावा घेतला.
अग्निपथ योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावणीच्या प्रगतीसंदर्भात तपशीलवार चर्चा करण्यात आली. या परिषदेमध्ये लष्करी तुकड्या तसेच निवृत्त सैनिकांसाठी अनेक कल्याणकारी उपाययोजना आणि उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.दिल्ली कॅन्ट येथील थल सेना भवनचे बांधकाम मार्च 2023 मध्ये सुरु झाल्याचे अधोरेखित करण्यात आले. 2025 मध्ये या भवनाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे भवन केवळ कार्यालयीन जागांचीच कमतरता दूर करणार नाही तर सर्व संचालनालयांना एकाच छताखाली आणून लष्कराच्या मुख्यालयाचे कार्यान्वयन आणि कार्यक्षमता वाढवेल.
ज्या सैनिकांना कर्तव्यावर असताना शारीरिक इजा झाली आहे त्यांची लढण्याची दुर्दम्य भावना आणि हार न मानण्याची वृत्ती अधोरेखित करण्यासाठी, लष्कराच्या क्रीडास्पर्धा आणि मिशन ऑलिंपिक केंद्रामध्ये नऊ क्रीडा स्पर्धांसाठी निवडक सैनिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना पॅरालिम्पिक स्पर्धांसाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या दिव्यांग मुलांच्या कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, एजीआयएफ म्हणजेच लष्कर संयुग विमा निधीच्या माध्यमातून अशा मुलांचा निर्वाह भत्ता दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला.