हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा – आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

– आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते २७ जिल्ह्यांतील हिमोफिलिया डे-केअर सेंटर्सचे उद्घाटन

– आता राज्यातील सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे केअर सेंटर

मुंबई :- हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होती. मात्र आता नव्याने २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा मोफत उपलब्ध झाली असून रुग्णांना दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी आज केले.

हिमोफिलिया रुग्णांना रक्त गोठविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्स राज्यातील सर्व जिल्ह्यांत उपलब्ध करून देण्यासाठी नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे आज (दि. २६ फेब्रुवारी) आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या हस्ते मंत्रालयीन दालनात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावर , आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे, सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर उपस्थित होते. तर सर्व जिल्ह्यांतील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नवीन हिमोफिलिया सेंटर्सचे अधिकारी कर्मचारी, रुग्ण दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी हिमोफिलिया रुग्णांशी संवाद साधला. ही सेवा जिल्हा स्तरावर घराजवळ उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांनी आरोग्य मंत्र्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हैसकर यांनी या उपक्रमाविषयी महिती दिली.

हिमोफिलिया डे केअर सेंटर या उपक्रमाबाबत जिल्हास्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, सेंटरच्या बाहेर संपूर्ण तपशीलवार माहिती असणारा फलक लावण्यात यावा. याबाबत समाज माध्यमे तसेच प्रसारमाध्यमांमधून जनजागृती करावी. सेंटरमधील औषध साठ्याची उपलब्धतेनुसार ताबडतोब मागणी नोंदवावी. या ठिकाणी औषधांचा तुटवडा कुठल्याही परिस्थितीत निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१३ पासून हिमोफिलिया रुग्णांसाठी एकूण ९ हिमोफिलीया डे- केअर सेंटर्स सुरू आहेत. मात्र आता आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा सुरु करण्यात आली आहे. हिमोफिलिया आजाराच्या रुग्णांमध्ये रक्तातील रक्त गोठविणाऱ्या फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे स्नायू, सांध्यांमध्ये, दातामधून, नाकपुड्यातून तसेच मेंदूत रक्तस्त्राव होतो. फॅक्टरच्या कमतरतेच्या तिव्रतेमुळे वारंवार रक्तस्त्राव होऊ शकतो. ही फॅक्टर्स इतर औषधांच्या तुलनेने महागडी आहेत. रक्तस्त्राव होत असलेल्या परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी प्रवास करावा लागतो, ही बाब लक्षात घेऊन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले फॅक्टर्स सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार उर्वरित सर्व जिल्ह्यांत नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत.

हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव होतो. हा आजार वाय गुणसूत्राच्या दोषामुळे होत असल्याने प्रामुख्याने पुरुष हे या आजाराने ग्रस्त आढळतात. मात्र स्त्रिया या आजाराच्या वाहक आढळतात. राज्यात अशा आजाराचे अंदाजे ४,५०० रुग्ण आहेत.

रायगड, पालघर, धुळे, बीड, पुणे, सोलापूर, नंदुरबार, कोल्हापूर, जळगांव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, परभणी, सांगली, हिंगोली, बुलढाणा, नांदेड, लातुर, धाराशीव, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत नवीन हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्यामुळे रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच मोफत व वेळेत उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांतील रुग्णांना याचा लाभ होणार असून सहज उपचार मिळणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान

Tue Feb 27 , 2024
मुंबई :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त, नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी 20 हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार असल्याबाबतचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com