– निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपुर्णता अभियानाचे उद्घाटन
यवतमाळ :- निती आयोगाच्यावतीने आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत संपुर्णता अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या उपस्थितीत झरी जामणी येथे आज झाले. आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात एकत्रितपणे उत्तम काम करा, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे, तहसीलदार नरेंद्र थोटे, गटविकास अधिकारी रविंद्र कुमार सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन गेडाम, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रभाकर पांडे, तालुका कृषी अधिकारी अमोल आमले, आकांक्षित तालुका कार्यक्रम फेलो अनिल नरवाडे आदी यावेळी उपस्थित होते.
सदर अभियान दि.१ जुलै ते दि.३० सप्टेंबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमामधील संपूर्ण दर्शकामध्ये संपूर्णता यावी, असे निती आयोगाला अपेक्षित आहे. या अभियानांतर्गत येणारे दर्शके आणि त्यांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी यांनी चर्चेसाठी घेतला आणि त्या संदर्भात असणाऱ्या प्रशासकीय अडचणींवर कार्यवाही केली. निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या शिक्षण, आरोग्य, कृषी, उमेद, पशुसंवर्धन इत्यादी विभागांच्या दर्शंकांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
संपुर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुती पुर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण आणि बचतगटांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर, १० वी १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी हे दर्शके आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी आशा, अंगणवाडी सेविका, एएनएम यांच्या कामाचे कौतूक केले. सर्वांनी एकत्र येऊन आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात उत्तम काम करावे. कमी वयातील विवाहीत जोडप्यांना गर्भधारणा वयाच्या २१ वर्षांनंतर चांगली आणि सुरक्षित कशी होऊ शकते, याबाबत समुपदेशनाद्वारे पटवून द्यावे. यामुळे जास्त वजनाची बालके जन्माला येण्याचा दर वाढेल. गर्भावस्थेदरम्यान महिलेचे वजन कसे वाढवता येईल यावर विशेष लक्ष द्यावे आणि पोषण ट्रॅकरवरील माहिती वास्तविक असावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थितांनी संपूर्णता अभियानातील दर्शकांची संपूर्णता करण्यासाठी योगदान देण्याचे आणि आकांक्षित तालुक्याला आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध बनविण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे संचालन आकांक्षित तालुका फेलो अनिल नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी, उमेद-बिएमएम, आशा, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कर्मचारी, एएनएम व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.