लोकसहभागातून शहर हत्तीरोगमुक्त करूया : राधाकृष्णन बी. यांचे आवाहन

हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणांचे वितरणाचे देशातील पहिल्या अभिनव प्रकल्पाची आयुक्तांच्या हस्ते सुरुवात

नागपूर :- नागपूर शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत आहेत. संपूर्ण शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असून, लोकसहभागाने हत्तीरोगमुक्त नागपूर साकारता येईल असा विश्वास व्यक्त करीत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणे वितरण करणाऱा देशातील पहिल्या अभिनव उपक्रम सुरु केला आहे. 

नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणांचे वितरण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात बुधवार (ता.२३) रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहा. सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग) डॉ. निमगडे, WHO समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी, रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनचे अध्यक्ष डॉ. विकास इंगळे, विवेक देशपांडे, पात्रीकर यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते हत्तीरोगग्रस्त रुग्णांसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या पादत्राणांचे वितरण करण्यात आले. राधाकृष्णन बी. यांनी स्वतः रुग्णांना पादत्राणे परिधान करून दिले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राधाकृष्णन बी. म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेतर्फे मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे MMDP क्लिनिक (Morbidity Management and Disability Prevention)/ हत्तीरोग व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MMDP क्लिनिक सुरू करणारी नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. याशिवाय हत्तीरोग आजाराविषयी आणि त्यापासून बचावासाठी दिल्या जाणा-या प्रतिबंधात्मक गोळ्यांच्या संदर्भात जनजागृती केल्या जात असल्याचे सांगत राधाकृष्णन बी. पुढे म्हणाले की, हत्तीरोग हा जीवघेणा आजार नसला तरी यामुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते. मनपातर्फे राबविण्यात येणाऱ्या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेला मिळालेल्या सहकार्यामुळे शहरातील काही भाग हत्तीरोगमुक्त झालेला आहे. मात्र अजूनही काही भागांमध्ये या आजाराचा प्रभाव दिसून येतो. तरी संपूर्ण शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन सारख्या संस्थांनी अशा मानव कल्याण उपक्रमासाठी पुढे येणे ही अत्यंत चांगली बाब असून, इतरही संस्थांनी याचे अनुकरण करून नागपूर शहराला स्वस्थ बनविण्यात सहकार्य करावे असे आवाहनही राधाकृष्णन बी. यांनी केले. असे झाल्यास नागपूर महानगरपालिका आरोग्य क्षेत्रात २०२५ पर्यंत नक्कीच पुढे जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय अशा लोकोपयोगी उपक्रमाला वेळेच्या आता सुरू करणाऱ्या हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी यांचे अभिनंदनही राधाकृष्णन बी. यांनी केले.

’वैद्यकीय उपचारांपलीकडे जाऊन काळजी घेणे’ ही संकल्पना

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी यांनी केले. त्या म्हणाले की, हत्तीरोग ग्रस्त रुग्णांची संख्या ही चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांपैकी अधिक आहे. सध्या नागपुरात हत्तीरोगाचे ८३७ रुग्ण आहेत. त्यापैकी १०० अत्यंत गरजू रुग्णांना रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनच्या वतीने विशेष पादत्राणे देण्यात आले आहेत. सर्वप्रथम २५ रुग्णांना हे पादत्राणे वितरीत करण्यात आले असून, अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी नागपूर महानगरपालिका देशातील प्रथम महानगरपालिका ठरली आहे. या प्रकल्पासाठी ’वैद्यकीय उपचारांपलीकडे जाऊन काळजी घेणे’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली असल्याचे डॉ. जास्मीन मुलानी यांनी सांगितले.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com