नागपूर, ता. १९ : महान वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावली. आपल्या आयुष्याचा अखेरच्या क्षणापर्यंत ब्रिटिशांशी लढा देत राहिली आशा विरांगनेचे नाव राज्य शासनाने महापुरुषांच्या जयंती व पुण्यतीथीच्या यादीत समाविष्ठ करावे, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली. शुक्रवारी (ता.१९) झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त सीताबर्डी येथील झाशीराणी चौकात अभिवादन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राज्य शासनातर्फे महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येते. शासनाच्या परिपत्रकानुसार जयंती व पुण्यतिथींची यादी महानगरपालिकेला देण्यात येते. मात्र या महापुरुषांच्या यादीत झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाचा समावेश नाही, ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्वरित महापुरुषांच्या यादीत झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाचा समावेश करावा.
ते पुढे असेही म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना अभिवादन केले. माझा नावाला विरोध नाही. मात्र, महापुरुषांच्या यादीत प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव असणे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव नसणे ही आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित यादीत सुधारणा करून झाशीच्या राणीचे नाव समाविष्ठ करावे, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केली.