‘नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्ष’ राज्यभर स्थापन करणार -आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित

नागपूर, दि. 30 : आदिवासी समाजातील युवक आणि युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती होण्याची गरज आहे. नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाच्या माध्यमातून ही गरज पूर्णत्वास येणार आहे. अत्यंत कौतुकास्पद अशी ही कक्ष संकल्पना राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज येथे सांगितले.

नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाचे उदघाटन आज आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री विजयकुमार गावित बोलत होते. आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, सहाय्यक आयुक्त दशरथ कुळमेथे, उद्योजक गजानन भलावी यांच्यासह आदिवासी समाजातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मंत्री विजयकुमार गावित पुढे बोलताना म्हणाले की, आदिवासी समाज हा विविध कौशल्याने परिपूर्ण आहे. त्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या क्षमता आहेत. त्यांच्या या क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे. त्यांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी हा कक्ष मोलाची भूमिका बजावणार आहे. विविध योजना, उपक्रम तसेच शासकीय नोकरीची माहिती या कक्षाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचा विशेष आनंद आहे. माहिती देणारी व्यक्ती ही स्थानिक भाषिक असावी, अशी सुचनाही मंत्री गावित यांनी यावेळी केली.

राज्य शासनाचे विविध विभाग तसेच खाजगी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधी ओळखून रोजगार मेळावा घेण्याचे नियोजन आहे. उद्योजकांना या रोजगार मेळाव्यात निमंत्रित करण्यात येईल. आदिवासी समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री गावित पुढे म्हणाले.

तत्पूर्वी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त दशरथ कुळमेथे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाविषयीची माहिती दिली.

नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाविषयी…

आदिवासी समाजातील तरुण आणि तरुणींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधींची माहिती व्हावी यासाठी नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाची कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गिरीपेठ येथील अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांच्या कार्यालयातील तळमजल्यात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. रोजगार व स्वयंरोजगार असे गट या कक्षात असणार आहेत. रोजगार या विभागात विविध शासकीय रोजगाराच्या संधींची माहिती देण्यात येईल. तर स्वयंरोजगारामध्ये खाजगी क्षेत्रात असलेल्या विविध संधींची माहिती दिली जाणार आहे. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहितीही यावेळी दिली जाईल. यासाठी आदिवासी विकास विभाग आणि टिक्की या आदिवासी समाजाच्या उद्योग संघटनेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी यावेळी माहिती देण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com