– शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत सुनील केदार आक्रमक
नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता शासनाने आत्मचिंतन करावे असे मत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी मांडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते.
राज्य शासन हे शेतकऱ्यांच्या समस्येवर गंभीर नाही असे खडेबोल सुनील केदार यांनी सुनावले. आज शेतकरी कोणत्या समस्येतून जात आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस अजून खरेदी झाला नाही याची कोणत्याही प्रकारची काळजी शासनाला नाही आहे. आज शेतकरी आत्महत्या करण्याकरिता प्रवृत्त होत आहे पण त्याला आत्महत्या पासून परावृत्त करणेकरिता शासनाची कुठलीही ठोस भूमिका नसल्याचे केदार यांनी सांगितले.
आपल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडी शासनाचा उल्लेख करत कोरोना काळात संपूर्ण जग थांबल्या स्थितीत होतं त्यावेळी सुद्धा वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री असतांना संपूर्ण वर्धा जिल्हा सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी यांना घेऊन फिरून महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कापूस खरेदी केले असल्याचे सांगितले.
आपल्या गृहजिल्ह्यात नागपुरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बेरोजगार युवक व युवतींना रोजगार मिळावा म्हणून पशुधनाचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात तो यशस्वी सुद्धा झाला पण राज्यातील सरकार बदललं आणि त्या पायलट प्रोजेक्ट चा निधी बंद करून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले. कित्येक महिने त्याची चौकशी झाली व एक वर्षानंतर राज्य शासनाने त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्णय दिला.
राजकीय आकसापोटी सदर योजनेला निधी मात्र दिला गेला नाही.
त्याचप्रमाणे सन २०२२ मधे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवठा होणेकरिता छोटे छोटे बंधारे दुरुस्ती होणेकरिता निधी मंजूर झाला परंतु सत्तापालट होताच सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या कामांवर स्थगिती आणण्याचे काम केले गेले. मात्र राजकीय आकसापोटी केल्या गेलेल्या कार्यवाहीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले.
या राज्यात इतके कृषी विद्यापीठ आहेत परंतु सामान्य शेतकऱ्यांना त्याचा कुठला लाभ होत आहे असा सरळ प्रश्न सुनील केदार यांनी केला. या देशातील शेतकरी व कष्टकरी जगेल तरच देश जगेल. राजकीय आकस काढणेकरिता निवडणूक आहेतच परंतु शेतकऱ्यांना धारेवर धरू नका असा मार्मिक आणि भावनिक सल्ला सुनील केदार यांनी शासनाला दिला.