पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार होते. ते सन 2019 मध्ये वाढवून 6 हजार 500 इतके करण्यात आले आहे. यामध्ये अधिक वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच ग्राम पोलीस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलीस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यात येतील.

पोलीस पाटील यांच्या नियुक्तीच्या नुतनीकरणासाठी आवश्यक दाखले यांची पूर्तता करतानाच ही प्रक्रिया वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नुतनीकरणाचा कालावधी हा 10 वर्षाचा करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात येईल. ‘कोविड’ काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सानुग्रह साहाय्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून पात्र पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आश्रमशाळेतील भोजनाच्या ई-निविदेची प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करणार - मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Sat Mar 11 , 2023
मुंबई : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी १३४ कोटी ४० लाखांची ई-निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात ही प्रक्रियापूर्ण होईल. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा पोषण आहार पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांकरीता अन्नधान्य खरेदीच्या निविदा प्रक्रियेबाबत सदस्य रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com