नागपूर : कोरोना महामारीत पालक गमावलेल्या मुलांना व विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण द्या, स्टार्टअप प्रोग्रामद्वारे त्यांना रोजगार मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केल्या.
जिल्हा कृती दल, बालकल्याण समिती व मिशन वात्सल्य योजनेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. चाईल्ड लाईन समितीचे संचालक केशव वाळके, बालकल्याण मंडळाच्या अध्यक्ष छाया राऊत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, कौशल्य व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे,समितीचे सदस्य व वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागात सामाजिक तपासणी अहवालाद्वारे पालक गमावलेल्या मुलांची चेकलिस्ट तयार करा. त्यासोबतच विधवा महिलांना वारसा हक्क प्रमाणपत्र, मालमत्ता हक्काबाबत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. महिलांच्या मालमत्तेबाबत नोंद घेणे आवश्यक असून त्याबाबत तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहे. संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी निवृत्ती योजनांचा लाभ या महिलांना तत्काळ द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.